Pune Traffic : पुणे-बंगळूर सेवा रस्त्यांची बिकट अवस्था! खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त; पावसाळ्यात धोकादायक स्थिती
esakal September 20, 2025 12:45 PM

बावधन : पुणे-बंगळूर महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांचे हाल सुरू असून, या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचल्याने ते दिसत नाहीत आणि त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा मात्र अद्याप निष्क्रियच आहे.

बावधन ते सूसखिंडदरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. बावधन येथील खंडोबा मंदिर, भुंडे वस्तीजवळील सेवा रस्त्यावर खोदकाम करून उघड्यावरच खडी पसरलेली असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे; तर यांसह सुतारवाडी पश्चिम भागातील पंजाब हॉटेलजवळ ते सूसखिंडदरम्यान वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

ननावरे चौक ते राधा चौकदरम्यानही सेवा रस्त्याची हीच अवस्था असून, दुरुस्तीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. बावधन परिसरात सेवा रस्त्यावर खड्डे असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे.

शहाड–मुरबाड व कल्याण–कर्जत रस्त्यांची बिकट अवस्था

महामार्गाच्या पूर्व व पश्चिमेकडील सेवा रस्त्यांची झालेली दुरवस्था, ही अपघातास कारणीभूत ठरत आहे. वाहनचालकांनी आणि नागरिकांनी यासंबंधी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. अपघातांचा धोका लक्षात घेता, या सेवा रस्त्यांची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.

बावधन परिसरातील रस्त्याची अवस्था खूपच चिंताजनक आहे. खडी पसरल्यामुळे रस्ता धोकादायक झाला असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रवाशांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्ती करून रस्त्याची सुरक्षात्मक सुधारणा करावी, अन्यथा कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे.

- सूर्यकांत भुंडे, रहिवासी, बावधन

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.