कर्वेनगर : कोथरूड परिसरातील सर्वे नं. सात आणि आठमधील पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान हे केवळ कागदावरच अस्तित्वात आहे. मागील २३ वर्षांपासून या प्रकल्पाला वारंवार कायदेशीर अडचणींचा फटका बसला आहे. परिणामी निधीची उधळपट्टी होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे उद्यान होणार कधी असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे.
कोथरूडमधील या जागेवर उद्यान उभारण्याचा प्रस्ताव २००३ मध्ये तत्कालीन नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी मांडला होता. त्या वेळी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, या प्रकल्पासाठी जमिनीचा प्रश्न मोठा अडथळा ठरला. या उद्यानाची अर्धी जागा खासगी तर उर्वरित जागा ही महापालिकेची होती. उद्यान विभागाने जागामालकाला विश्वासात न घेता आणि कोणताही मोबदला न देता काम सुरू केल्याने उद्यानाचे काम अपूर्ण राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
पुणे : शेवाळेवाडी फाट्यावरील चेंबर दुरुस्तीला मुहूर्त कधी?महापालिकेच्या उद्यान विभागाने ताब्यात नसलेल्या जागेवर निधी खर्च करून जॉगिंग ट्रॅक, खेळणी, आसनव्यवस्था अशा काही सुविधा उभारल्या होत्या, मात्र अद्यापही या जागेचा प्रश्न मार्गी न लागल्याने या ठिकाणी आता फक्त राडारोडा दिसून येतो. सध्या या जागेवर अस्वच्छता पसरली असून जागेचा वापर मद्यपींकडून केला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना चालण्यासाठी व धावण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांना खेळण्यासाठी बालोद्यान, सांस्कृतिक ओळख जपणारे बारा बलुतेदारांचे प्रदर्शनी पुतळे सर्व सुविधांचे नियोजन असलेले हे उद्यान फक्त कागदावर असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
मागील दोन दशकांत अनेक नगरसेवक या भागातून निवडून आले, पण त्यांनीही या प्रलंबित कामाकडे दुर्लक्ष केले. त्याहून दुर्दैवाची बाब म्हणजे कोथरूडमधून निवडून आलेल्या एकाही आमदाराने या वादात मध्यस्थी करून तो सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. या ठिकाणी निधीची उधळपट्टी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
- हेमंत सभुंस, स्थानिक नागरिक
या उद्यानाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. संबंधित उद्यानावर निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही. न्यायालयीन वाद मिटला की अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून उद्यानाचे काम पूर्ण करून उद्याने नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे.
- अशोक घोरपडे, सहाय्यक पालिका आयुक्त, उद्यान विभाग