Atul Save: राज्यातील आश्रमशाळांत सौरऊर्जा प्रकल्प; अतुल सावे : विजेची समस्या कायमस्वरूपी दूर होणार
esakal September 21, 2025 01:45 AM

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील आश्रमशाळांमध्ये वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व आश्रम शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

अतुल सावे म्हणाले, की आश्रमशाळा बहुतेक वेळा दुर्गम व आदिवासी भागात असल्याने त्या ठिकाणी वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्या उद्भवतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत व्यत्यय येऊ नये म्हणून आश्रमशाळांना पर्यायी ऊर्जेचा स्रोत उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.

Premium|Indian Economy : भारत बनला चौथी मोठी अर्थव्यवस्था

त्यासाठी सौरऊर्जा हा सर्वांत सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय आहे. पूर्वी काही आश्रमशाळांमध्ये प्रायोगिक पातळीवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात आले होते. त्या अनुभवाच्या आधारे ही योजना आता संपूर्ण राज्यात विस्तारली जात आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील निवडक जिल्ह्यांमध्ये पायलट प्रकल्प उभारण्यात येतील. त्यानंतर सर्व आश्रमशाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सौर पॅनल्स बसवले जातील.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने महाऊर्जा या संस्थेची निवड केली असून, देखभाल व तांत्रिक सहाय्यासाठी विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. केंद्र शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सौर प्रकल्पांमुळे आश्रमशाळांना विजेचा अखंडित पुरवठा मिळेलच, शिवाय वीजबिलांवरील मोठा खर्च वाचणार आहे.

सौरऊर्जेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक, शैक्षणिक साधने, शुद्ध पिण्याचे पाणी व इतर सुविधा अखंडितपणे वापरता येणार आहेत. हा उपक्रम आत्मनिर्भरतेकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत सावे यांनी योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचा विश्वास व्यक्त केला.

Premium| India space program: अवकाशावर सामर्थ्य सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू आहे. भारत या शर्यतीत वेगाने पुढे जात आहे मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक

मराठवाड्यात भविष्यात १ लाख कोटींची गुंतवणूक उद्योग क्षेत्रात होत आहे. यामधून सुमारे ५० हजारांहून अधिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचेही सावे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नांदेडचा पालकमंत्री म्हणून तेथील शाळा, शैक्षणिक संस्थांना मागेल ती मदत देण्यास कटिबद्ध आहे. नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील असून दळणवळणासाठी शासन स्तरावर नेहमी प्रयत्न केले आहेत. नांदेड येथून नुकतीच वंदे भारत एक्स्प्रेस व विमानसेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे आता नागरिकांना दळणवळणाची सुविधा प्राप्त होऊन उद्योग-व्यवसाय व नांदेडच्या विकासाला चालना मिळणार आहे, असेही सावे यांनी नमूद केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.