बांगलादेश क्रिकेट टीमने आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने बांगलादेशसमोर 169 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशने हे आव्हान 1 बॉलआधी 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बांगलादेशने या विजयासह श्रीलंकेने साखळी फेरीत केलेल्या पराभवाची अचूक परतफेड केली. श्रीलंकेने बांगलादेशला 13 सप्टेंबरला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. बांगलादेशने सुपर 4 मध्ये विजय मिळवून या पराभवाचा हिशोब बरोबर केला आहे.
बांगलादेशच्या विजयात ओपनर सैफ हस्सन आणि तॉहिद हृदॉय या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर कॅप्टन लिटन दास आणि शमीन हौसेन या दोघांनीही योगदान दिलं. मात्र त्यानंतरही बांगलादेशला विजयासाठी शेवटच्या ओव्हरपर्यंत प्रतिक्षा करावी लागली.
बांगलादेशसाठी सैफ हस्सन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सैफने 45 बॉलमध्ये 135.56 च्या स्ट्राईक रेटने 61 रन्स केल्या. सैफने या खेळीत 4 सिक्स आणि 2 फोर लगावले. तॉहिद हृदॉयने 37 चेंडूत 156.76 च्या रनरेटने 58 रन्स केल्या. तॉहिदने या खेळीत 2 फोर आणि 4 सिक्स झळकवले. लिटनने 23 रन्स केल्या. तर शमीम हौसेन याने नाबाद 14 धावा केल्या. तर इतरांनी दिलेल्या योगदानामुळे बांगलादेशने कसाबसा का होईना मात्र विजय मिळवला. श्रीलंकेसाठी वानिंदु हसरंगा आणि दासुन शनाका या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर नुवान तुषारा आमि दुष्मंथा चमीरा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगला बोलावलं. श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 168 रन्सपर्यंतच पोहचता आलं. दासुन शनाका याने केलेल्या नाबाद अर्धशतकामुळे श्रीलंकेला 150 पार मजल मारता आली. दासुनने श्रीलंकेसाठी सर्वाधिक आणि नाबाद 64 रन्स केल्या. तर इतर चौघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना ही खेळी मोठ्या आकड्यात बदलता आली नाही.
बांगलादेशने श्रीलंकेला लोळवलं
कुसल मेंडीस याने 34, पाथुम निसांका याने 22, कॅप्टन चरिथ असलंका याने 21 आणि कुसल परेराने 16 धावा केल्या. यापैकी एकानेही आणखी मोठी खेळी केली असती तर श्रीलंकेला 200 पार पोहचता आलं असतं. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी तसं करु दिलं नाही. बांगलागदेशसाठी मुस्तफिजुरने 3, महेदी हसनने 2 आणि तास्किन अहमदोने 1 विकेट मिळवली.