पहिली माळ कोंडीमुक्तीची
मुख्यमंत्र्यांमुळे ठाणेकरांना घडला जलद प्रवास; कापूरबावडी ते फाउंटन अंतर १० मिनिटांच्या टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी प्रवास करायचा म्हणजे अर्धा तास आधी घरातून निघायचे हे आता ठाणेकरांच्या अंगवळणी पडले आहे; मात्र सोमवारी (ता. २२) घोडबंदर मार्ग वाहतुकीसाठी चक्क मोकळा मिळाला. तसेच रस्त्यावरील खड्डेही गायब झाले होते. परिणामी फाउंटन ते कापूरबावडी हे अंतर अवघ्या सात ते १० मिनिटांत पार झाले. नवरात्रोत्सवाची पहिली माळ कोंडीमुक्तीची ठरली. याला कारण ठरले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाणे आगमनाचे. मेट्रो चार ‘अ’च्या चाचणीसाठी ते येणार असल्याने एका रात्रीत प्रशासनाने हा चमत्कार घडवला.
घोडबंदर मार्ग गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीमुळे गाजत आहे. या मार्गावरची कोंडी सोडवण्यासाठी नवनवीन युक्त्या लावल्या जात आहेत. किंबहुना घोडबंदर मार्ग ही प्रयोगशाळा बनल्याची भावना ठाणेकरांमधून व्यक्त होत होती. अवजड वाहनांसंदर्भात फसलेला प्रयोग चर्चेचा विषय बनला आहे, तर दुसरीकडे गायमुख घाटासह घोडबंदर मार्गावरील खड्डे कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळी हा मार्ग वाहतूक कोंडीत सापडत आहे. अवघ्या १० मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनांना अर्धा ते एक तास मुंगीच्या गतीने मार्गक्रमण करावे लागत आहे. शनिवार, रविवार थोडा दिलासा मिळत असला तरी सोमवारपासून पुन्हा ये रे माझ्या मागल्या... अशी परिस्थिती निर्माण होते.
सोमवार म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस असल्याने शंभर टक्के कोंडी मिळणार हे गाठीशी धरून खासगी वाहनाने प्रवास करणारे ठाणेकर घराबाहेर पडले, पण कधी नव्हे इतका घोडबंदर मार्ग मोकळा मिळाला. रस्त्यावर खड्डे नव्हते. ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात होते. कुठेही कोंडी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जात होती. त्यामुळे गायमुखवरून येणाऱ्या वाहनांना अवघ्या १५ मिनिटांत माजिवाडा गाठता आला, तर फाउंटन ते कापूरबावडी या अंतरासाठी रोज पाऊण तास खर्ची घालणाऱ्यांचा प्रवास सात ते १० मिनिटांत झाला. मोठ्या कुतूहलाने वाहनचालकांनी याविषयी माहिती घेतली असता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे कारण समोर आले.
मुख्यमंत्र्यांनो रोज येवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी मेट्रो चार अ च्या ट्रायल रनसाठी ठाण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या आगमनाआधी प्रशासनाने ठाण्यातील खड्डे बुजवत कोंडी होणार नाही याची काटेकोरपणे काळजी घेतली होती. खरेतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे ठाणे हे शहर, तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हेसुद्धा ठाणेकरच, पण मुख्यमंत्री ठाण्यात येणार म्हणून जर वाहतूक कोंडी सोडवता येत असेल, तर या सुखद अनुभवासाठी मुख्यमंत्र्यांनो रोज ठाण्यात येवा, अशी भावना वाहनचालकांनी व्यक्त केली.
..............................