राम काळगे
निलंगा : निलंगा तालुक्यातील तेरणा नदीला मोठा पूर आला असून या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कांही मुख्य रस्ते बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. माकणी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे सध्या पाण्याचा प्रवाह वाढत चालला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला असून प्रकल्पातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्यामुळे निलंगा ते कासार सिरशी,उमरगा हा राज्य मार्ग रात्री पासून दिवसभर बंद आहे यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला नदी पात्राच्या बाहेर पाणी पडल्यामुळे नदी काठाचे शेकडो हेक्टर खरिपाची पीक पाण्याखाली गेली आहेत.
माकणी (ता.लोहारा) येथील निम्न तेरणा धरणाचे पानी तेरणा नदीत सोडले असल्याने पाणी पात्राबाहेर पडले आहे. तेरणा नदीवरील मदनसुरी, लिंबाळा, नदी हत्तरगा बॅरिज वरून पाणी वाहत असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.पाण्यामुळे निलंगा तालुक्यातील नदी काठच्या जेवरी,सांगवी,मदनसुरी, रामतीर्थ, कोकळगाव,धानोरा, लिंबाळा,येलमावाडी,नदी हत्तरगा या गावातील जवळपास चार ते पाच हजार हेक्टर वरील सोयाबीन, तूर,उडिद हे खरीप पीकाचे नुकसान झाले.नदीच्या दोन्ही बाजूने अर्धा किलोमीटर पर्यंत पाणी पसरले असून या नदीवरील मदनसुरी, नदी हत्तरगा,लिंबाळा या तिन्ही बॅरिज वरून पाणी वाहत असल्याने तालुक्यापासून कासार सिरशी,मदनसुरी, कासार बालकुंदा,सरवडी या गावा सह अनेक गावाचा संपर्क रात्री पासून तुटला आहे.तसेच निलंगा ते सिरशी,मदनसुरी ते किल्लारी,मदनसुरी ते निलंगा हे प्रमुख मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद आहे.अद्याप धरणातुन मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.या भागातील जनजीवण विस्कळीत झाले आहे.
संततधार पावसामुळे मदनसुरी मंडळातील हजारो हेक्टरवरील पिके धोक्यातगेल्या काही दिवसांपासून मदनसुरी सह परिसरात अतिवृष्टी होत आहे.त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग,तूर या आठ हजार वरील खरिपाच्या पिकाची पूर्णपणे नासाडी झाली असून या निसर्गाच्या संकटामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे.
निम्न तेरणा प्रकल्पातुन होणार विसर्ग....माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने ता.२२ सकाळी १० वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण ०६ द्वारे हे १० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढ करण्यात आला आहे. एकूण १२ वक्रद्वारे ५० सेंटिमीटर ने चालू असून एकूण २२६२१ क्यूसेक्स (६४०.५९) क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे.त्यामुळे मदनसुरी मंडळातील शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली आहे.
पोलीस स्टेशन कासार शिरसी हद्दीतील
1.लिंबाळा ते निलंगा
2 मदनसुरी ते धानोरा
3कोकळगाव ते नदी हत्तरगा
4 उस्तुरी ते टाकळी
5 बडूर ते कासार बालकुंदा या ठिकाणचे पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतूक बंद करण्यात आला आहे.तरी नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यावी.
प्रवीण राठोड ,पोलीस निरीक्षक कासार सिरशी
"खरिपाची पेरणी झाल्या पासून मोठ्या प्रमाणात सुरू असून अगोदरच सोयाबीन पूर्णपने हातचे गेले आहे.त्यात गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव व लातूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने माझे सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्यात गेले आहे.शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी."
अमोल माने,शेतकरी रामतीर्थ