पुणे : गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले, मात्र दुसऱ्या टप्प्यासाठीच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनाचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे काम मार्गी लागल्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक ते संचेती रुग्णालयासमोरील चौकापर्यंत वाहनांच्या मार्गातील अडथळा दूर होऊ शकणार आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकापासून रेंजहिल्स कॉर्नरपर्यंत उड्डाणपूल बांधला जात आहे. राजभवन ते रिझर्व्ह बॅंकेच्या कृषी महाविद्यालयापर्यंतचा (आरबीआय) पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास काही प्रमाणात मदत झाली आहे. दरम्यान, रेंजहिल्स कॉर्नर ते बाणेर, पाषाणच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सध्या वेगात सुरू आहे. याबरोबरच मेट्रो प्रकल्पाचेही काम सुरू आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून गणेशखिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूस रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार, ‘आरबीआय’ समोरील रुंदीकरण वगळता एक किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील विद्यापीठ चौक ते ई स्क्वेअर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ‘आरबीआय’ची जागा मिळण्याचा मार्ग यापूर्वीच मोकळा झाला आहे, मात्र तेथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे पुढील काम अद्याप झालेले नाही. त्यानंतर, महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यातील दोन किलोमीटरच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, संचेती रुग्णालय ते आरबीआय दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या टप्प्यामध्ये महापालिका, भारतीय हवामान खाते, कृषी महाविद्यालय, भारतीय आयुर्विमा महामंडळ, टपाल कार्यालये, आकाशवाणी यांसारखी केंद्र व राज्य सरकारची कार्यालये आहेत. संबंधित कार्यालयांची रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा मोठी आहे. एकूण ५२ मालमत्तांच्या जागा रुंदीकरणासाठी आवश्यक आहे. त्यामध्ये खासगी ११ व महापालिकेची एक अशा १२ जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत, उर्वरित ४० जागा ताब्यात येण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.
दृष्टिक्षेपात
दुसऱ्या टप्प्यात होणारे रुंदीकरण : २ किलोमीटर
रुंदीकरणातील मालमत्ता : ५२
ताब्यात आलेल्या मालमत्ता : १२
खासगी मालमत्ता : ३८
सरकारी मालमत्ता : १४
गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. खासगी मालमत्ता महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. सरकारी मालमत्तांची जागा मिळावी, यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील रुंदीकरणास सुरुवात होऊ शकते.
- मनोज गाठे, उपअभियंता,
पथ विभाग, पुणे महापालिका