टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे ड्युओलॉग एनएक्सटी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेत्री रेना -ली शिमोन पहिल्या पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या. शिमोन यांनी फौदा या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या वेबसिरीजमध्ये नुरीनची भूमिका साकारली आहे, त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली. दरम्यान या कार्यक्रमामध्ये सहभागी होत शिमोन यांनी बरुण दास यांच्यासोबत आपल्या आयुष्यात आलेली आव्हाने, ती सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आयुष्यातील ध्येयांबद्दल चर्चा केली.
या कार्यक्रमात बोलताना रेना -ली शिमोन यांनी म्हटलं की, आपल्या आयुष्यात, जीवनाच्या प्रवासात अनेक अडचणी येत असतात, त्यावर मात करून आपल्याला चिकाटीनं पुढे जावं लागतं. ‘सो यू थिंक यू कॅन डान्स‘ शोमध्ये मी पाचव्या क्रमांकावर होते, मात्र तरी देखील मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, यावरून हेच सिद्ध होतं की अपयशातून देखील तुम्हाला संधी मिळू शकते. जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यश मिळू शकतात, असं यावेळी शिमोन यांनी म्हटलं आहे.
यावर बोलताना बरुण दास म्हणाले की, ‘आयुष्यात कोणताही निर्णय योग्य नसतो, मात्र तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो आणि तो योग्य आहे हे सिद्ध करावं लागतं. अपयशामुळे खचून जाणं हा पर्याय नाही. तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्याचा निकाल काहीही असो, मात्र तुम्ही जर त्यातून शिकत राहिलात तर तुमच्या वाट्याला अपयश कधीच येणार नाही.
दरम्यान शिमोन पुढे बोलताना म्हणाल्या की, जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात, तुमचा तुमच्यावर विश्वास असतो. तेव्हाच तुम्हाला यश मिळतं. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं ध्येय गाठायचं असेल तर कठोर परिश्रम करा, कष्टाला पर्याय नाही, लक्षात ठेवा जर तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर ज्या गोष्टी घडणार नाहीत, त्या देखील घडतात, जगात अशक्य काहीच नाही.
ड्युओलॉग एनएक्सटीचा हा पहिला भाग आहे, ही एका नव्या अध्यायाची सुरुवात मानली जाऊ शकते. या शोच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या महिला या इतर महिलांसाठी एक नवा प्रेरणास्त्रोत ठरणार आहेत. या कार्यक्रमाचा संपूर्ण भाग 22 सप्टेंबर रोजी रात्री 10 : 30 वाजता न्यूज 9 वर प्रसारित होणार आहे, तसेच ड्युओलॉग यूट्यूब चॅनेल (@Duologuewithbarundas)आणि न्यूज 9 प्लस अॅपद्वारे देखील याचं स्ट्रिमिंग होणार आहे.