अनोळखी टोळक्यांकडून दोन भावांना मारहाण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर पडताना बंगल्याच्या गेटवरच अनोळखी आठ जणांच्या टोळक्याने दोन भावांना मारहाण करीत त्यांचे कपडेदेखील फाडल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. हा प्रकार रविवारी (ता. २१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. तक्रारदार मोठ्या भावाच्या दोन्ही डोळ्यांच्या बाजूला जखमा झाल्या असून, टाकेही पडले आहेत. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कासारवडवली, आनंदनगर येथे राहणारे तक्रारदार नकुल सिंग (२५) यांनी दिलेल्या तक्रारीत ते राहत असलेल्या बिल्डिंग येथील जीत नावाच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्याने ओवळा येथील एका बंगल्यात वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीसाठी तक्रारदारांचा लहान भाऊ दिलीप (१६) हा गेला होता. रात्री साडेआठ वाजल्याने त्याला आणण्यासाठी तक्रारदार गेले होते. ते दोघे बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडताना, पाठीमागून आलेल्या एका अनोळखी मुलाने दिलीप याला मारले. त्या वेळी त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या तक्रारदारांना त्या मुलांनी मारहाण केली. त्या मुलांनी दोघा भावांचे कपडेदेखील फाडले. या वेळी दिलीप याचे मित्र दुचाकीवरून आल्यावर त्यांच्या दुचाकीवर बसून थेट खासगी रुग्णालय गाठले. या प्रकारात तक्रारदारांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला, डाव्या डोळ्याचा वरच्या बाजूला, कपाळाला उजव्या डोळ्याच्या खालच्या बाजूला जखमा झाल्या असून टाकेही पडले आहेत, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अनोळखी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.