आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात भारत बांग्लादेश भिडणार आहेत. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे अंतिम फेरीच्या अपेक्षा कायम आहेत. या सामन्यातील विजयी संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असतील. बांग्लादेश संघ स्पर्धेत उलटफेर करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे बांगलादेशकडे लिंबूटिंबू संघ म्हणून पाहणं चुकीचं ठरेल. या सामन्यात दोन्ही संघांच्या फिरकीपटूंकडे लक्ष असेल. तसं पाहिलं तर या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. तसं पाहिलं तर या दोन्ही संघात काही वैर नाही. पण गेल्या काही वर्षात बांग्लादेश संघाचा नागिन डान्स पाहता एक प्रकारे चीड निर्माण झाली आहे. भारताने हा नागिन डान्स ठेचला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. बांगलादेशमधील शेख हसीना सरकार पडल्यानंतर राजकीय पातळीवरही तणावाचं वातावरण आहे. तसेच बांगलादेशने पाकिस्तानशी जवळीक साधली आहे.
भारतीय संघाची आशिया कप स्पर्धेत विजयी घोडदौड सुरु आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. यात पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे. त्यामुळे सुपर 4 फेरीतील हा सामना बांगलादेशसाठी कसोटी असेल. आशिया कपमध्ये दोन्ही संघ 15 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यापैकी 13 वेळा भारताने विजय मिळवला आहे. बांगलादेशने फक्त दोन जिंकले आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत 17 टी20 सामने झाले असून त्यापैकी फक्त एका सामन्यात बांगलादेशला विजय मिळाला आहे. बांगलादेशचा एकमेव विजय 2019 मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झाला.
भारताची सलामीची अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी सध्या फॉर्मात आहे. त्यामुळे या जोडीला रोखणं बांगलादेशी गोलंदाजापुढे असलेलं आव्हान आहे. अभिषेक शर्माने 210 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहे. तर शुबमन गिलही 158 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई करत आहे. दुसरीकडे, कर्णधार लिटन दास, सैफ हसन आणि तौहिद हृदयोय या स्पर्धेत चांगले खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या विजयात हसनने लिटनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली होती. तसेच हृदयोयसोबत आणखी 44 धावांची भागीदारी केली. यामुळे बांगलादेशला श्रीलंकेविरुद्ध आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करण्यास मदत झाली.