Children Fatigue Causes : मुलांच्या थकव्याकडे दुर्लक्ष करताय? पोषण आहाराची कमतरता हे असू शकतं कारण; वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
esakal September 24, 2025 12:45 AM

Children Health Tips for Parents: वाढत्या वयातील मुलांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने विविध पोषणतत्त्वांची गरज वाढते. या वयोगटातील मुलांमध्ये फक्त कॅल्शिअम आणि जीवनसत्त्व-डी(व्हिटॅमिन डी)चीच नव्हे, तर जीवनसत्त्व बी-१२ (व्हिटॅमिन बी १२)चीही कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या पोषणतत्त्वांच्या अभावामुळे मुलांना थकवा, हातपायांमध्ये मुंग्या येणे, सुन्नपणा, भूक न लागणे आणि त्वचेचा रंग फिकट पडणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू लागतात. अशा स्थितीत वेळेवर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते, असे बालरोगतज्ज्ञांचे मत आहे.

मुलांच्या विकासात व्हिटॅमिन बी-१२ महत्त्वाची भूमिका बजावते. ते मेंदूच्या कार्यास चालना देते, लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. तसेच, मज्जासंस्थेच्या विकासासाठी ते आवश्यक आहे. जेव्हा मुलांचे शरीर पुरेसे जीवनसत्त्व शोषून घेत नाही, साठवत नाही किंवा पुरेशी जीवनसत्त्वाची मात्रा मिळत नाही, तेव्हा ‘व्हिटॅमिन बी-१२’ची कमतरता निर्माण होऊ शकते. या जीवनसत्त्वाची कमतरता मेंदूविषयक समस्या निर्माण करू शकते. या जीवनसत्त्वाचा मुख्य स्रोत दूध, अंडी, मांस आणि मासे यांसारखे पदार्थ आहेत.

Explained: मोबाईल-कॉम्प्युटरच्या अतिरेकी वापरामुळे मानदुखीचा धोका वाढतोय, जाणून घ्या कारणं अन् उपाय

शाकाहारी आहार घेणारी मुले किंवा आहाराच्या चुकीच्या सवयी असलेल्या मुलांना याच्या कमतरतेचा धोका अधिक असतो. इतर कारणांमध्ये स्वयंप्रतिकार रोग, काही ठरावीक औषधे किंवा आनुवंशिकता यांचाही समावेश होतो.

इतर दिसणारी सामान्य लक्षणे म्हणजे थकव्याबरोबर ऊर्जेची पातळी मंदावणे, भूक न लागणे, बोलण्यात किंवा विकासात विलंब होणे, चिडचिड होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात किंवा शिकण्यात अडचण येणे, हीदेखील लक्षणे असू शकतात.

याबाबत वरिष्ठ नवजात शिशू आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारिख म्हणाले की, दर महिन्यात ४ ते १० वयोगटातील अंदाजे १० ते १२ मुले ही व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेसह आणि थकवा, स्नायूंचा कमकुवतपणा यांसारख्या लक्षणांसह येत आहेत. नियमितपणे चाचणी केलेल्या ३० टक्के बालकांमध्ये याची कमतरता आढळून आली. त्यांना उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. याच्या कमतरतेवर उपचार न केल्यास आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जसे- थकवा, समन्वय साधता न येणे, विकासात्मक विलंब आणि वजन न वाढणे अशा समस्या उद्भवतात. मुलांमध्ये रक्त चाचणीद्वारे या कमतरतेचे निदान केले जाऊ शकते.

Spinal Health Alert: हातातील अशक्तपणा किंवा सुन्नपणा दुर्लक्षित करू नका! असू शकतात पाठीच्या कण्यातील आजाराचे गंभीर संकेत

रक्तपातळी खूप कमी असेल तर मुलांना पूरक आहार किंवा इंजेक्शन्स घेण्याचा सल्ला दिला जातो. या उपचारांना विलंब करू नका, कारण वेळीच उपचार केल्याने दीर्घकालीन नुकसान टाळता येते. मुलाच्या पोषणावर लक्ष ठेवा आणि भविष्यात ते निरोगी राहील, याची खात्री करावी.

- डॉ. तुषार पारिख, वरिष्ठ नवजात शिशू आणि बालरोगतज्ज्ञ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.