शनीनगरकडे जाणारा रस्ता खचला
esakal September 24, 2025 02:45 PM

शनीनगरकडे जाणारा रस्ता खचला
बदलापूर पश्चिममध्ये अपघाताची भीती
बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : बदलापूर पश्चिमेतील शनीनगरकडे जाणारा मुख्य रस्ता खचल्याने स्थानिक नागरिक चिंतेत आहेत. या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या मध्यभागी बसवलेल्या पेव्हर ब्लॉक्सचा पट्टा ढासळल्यामुळे मोठ्या वाहनांनी हा मार्ग वापरल्यास अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्याच्या या भागात अचानक खड्डा तयार झाला असून, तिथून वाहन चालवणाऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

शनीनगर परिसरात गांधी टेकडी, मोहनानंदनगर आणि स्टेशन रोड येथून येणाऱ्या तीन रस्त्यांचा एकत्रित समावेश असलेल्या चौकात हा खड्डा आहे. या भागातील पेव्हर ब्लॉक्सचे काम करताना त्याखाली पुरेसा भराव न केल्याने हा खड्डा तयार झाल्याचे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले. या खड्ड्याचा काही भाग पूर्णपणे खचल्यामुळे मोठा अपघात घडण्याची भीती वाढली आहे. दररोज या रस्त्यावरून शेकडो वाहने चालतात. यामुळे अपघात टाळण्यासाठी काही नागरिकांनी या खड्ड्यात झाडांच्या फांद्या आणि फरशा टाकून वाहनचालकांना सावध केले आहे. तरीही रस्त्याच्या या भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रहिवासी आपली चिंता व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने या भागात दुरुस्तीचे काम करून नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी, असा आग्रह स्थानिकांनी केला आहे. याच वेळी रस्त्याच्या या स्थितीमुळे मोठ्या अपघातांची शक्यता अधिक असल्यामुळे तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मत रहिवाशांनी व्यक्त केले.

गांधी टेकडी परिसरातून शनीनगर ते हेंद्रेपाड्याकडे जाणारा हा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. दररोज येथे हजारो वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याच्या चौकात, जिथे मोहनानंदनगर, गांधी टेकडी आणि स्थानक रोडला जोडले जातात. पेव्हर ब्लॉकचा तळभाग ढासळला आहे. त्यामुळे सध्या मोठा खड्डा तयार झाला आहे. काही नागरिकांनी या खड्ड्यात झाडांच्या फांद्या आणि फरशा टाकून वाहनचालकांना सतर्क केले आहे. रात्री किंवा अचानक कोणताही वाहनचालक या खड्ड्याला टाळू शकणार नाही. स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांनी या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा मोठा अपघात होण्याचा धोका कायम आहे, असा इशारा प्रशासनाली दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.