पशुसंवर्धन विभागाची धावपळ
माथेरानधील घोड्यांवर मोफत औषधोपचार
माथेरान, ता. २३ (बातमीदार)ः पर्यटन नगरीच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या घोड्यांना विचित्र रोगाने पछाडले आहे. शहरातील ११ घोड्यांना कायमचे अंधत्व येण्याचा धोका असल्याने अश्वपालकांवर खर्चाचा डोंगर ओढावला होता. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने माथेरानमध्ये घोड्यांचे तपासणी तसेच मोफत औषधोपचारांना सुरुवात केली आहे.
माथेरानमध्ये ४६० प्रवासी, तर ३०० मालवाहतुकीसाठीचे घोडे वापरले जातात. त्यातील ११ प्रवासी घोड्यांना डोळ्यांची दृष्टी कमी होऊन अंधत्व येऊ लागले. या प्रकाराने अश्वपालकांच्या रोजीरोटीवर नवे संकट ओढावले होते, पण प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ‘सकाळ’ ने २१ सप्टेंबर रोजी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताना प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत मंगळवारी (ता. २३) पशुसंवर्धन विभागाचे २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक माथेरानमध्ये दाखल झाले. या पथकाने संपूर्ण माथेरान पिंजून काढत घोड्यांची तपासणी केली. सुरुवातीला लागण झालेल्या ११ घोड्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १० घोड्यांची दृष्टी पुन्हा पूर्ववत झाली असून, एकाची दृष्टी अंधुक असल्याने उपचार सुरू आहेत.
--------------------------------------------------------------------
दोन घोड्यांना अंधत्वाची लक्षणे दिसून आली. त्यांना तपासल्यानंतर एकाची दृष्टी परत आली आहे, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. सर्व घोड्यांची तपासणी, स्क्रीनिंग सुरू आहे.
- डॉ. प्रशांत कांबळे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कोकण विभाग, मुंबई
---------------------------------------------------------------------
कर्जत तालुक्यातील पशुधनापैकी माथेरानमध्ये प्रमाण अधिक आहे. तरीदेखील येथील दवाखान्यात डॉक्टरची नेमणूक केलेली नाही. शासनाने याची गंभीर दखल घेऊन येथे प्रभारी डॉक्टरची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी आहे.
- आशा कदम, अध्यक्षा, स्थानिक अश्वपाल संघटना