चास, ता.२१ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भातपिके आंब्यांनी लगडण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीनची पिके शेंगांनी बहरली असून, परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत. पिकेही जोमदार असल्याने चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
खेडच्या पश्चिम पट्यातील वाडा, वाळद, आव्हाट, खरोशी, डेहणे, भोरगिरी, चिखलगांव यांसह परिसरात खरीप हंगामात भात हेच मुख्य पीक असून चालू हंगामात चांगल्या झालेल्या पावसामुळे पिके जोमदार आहेत. काही भागात पिकावर खोडकिड, पाने गुंढाळणाऱ्या अळीबरोबरच तांबेरा व करपा रोगाचाही प्रादूर्भाव दिसून आला होता. त्यावर औषधांची फवारणी तसेच उपाययोजना केल्यावर पिकांची स्थिती सुधारण्यास मदत झाली होती. खरीप हंगामात दोन प्रकारच्या भाताची लागवड केली जाते. त्यामध्ये हळवा व गरवा त्यात हळवा भाताचे पीक लागवडीनंतर साधारण नव्वद ते शंभर दिवसात तयार होते. गरवा भाताचे पीक लागवडीनंतर १२० ते १२५ दिवसांत कापणीसाठी तयार होते.
काही दिवसांपासून पुन्हा पावसाने चांगली हजेरी लावल्याने पिके चांगली बहरली आहेत. सोयाबीन पीक शेंगांनी लगडले आहे. भुईमुगाची पिके आऱ्या लागण्याच्या अवस्थेत असल्याने या पिकालाही पावसाची गरज असतानाचा पावसाने जोरदारपणे आगमन केल्याने पिकांच्या पोषणासाठी हा पाऊस उत्तम ठरला आहे. गेली दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून चांगले ऊन पडत असल्याने उन्हामुळे पिकांच्या पोषणाला अनुकूल वातावरण झाले असल्याने शेतांमधील अन्य कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ मिळाला आहे.
03848