दशावतार : लोककला, मिथकं, निसर्ग आणि बदलत्या कोकणची गोष्ट आपल्यासाठी का महत्त्वाची?
BBC Marathi September 25, 2025 01:45 AM
Ocean Film Company दशावतार ही गोष्ट आहे दशावतार सादर करणाऱ्या बाबुलाल मिस्रीची.

'आपलं पोट भरण्यासाठी जमिनीचं पोट फाडून गोष्टी काढायची जागा म्हणजे खाण...तिथं काम करणं चांगलं नाही'

'मलाही नोकरी करावीशी वाटते की, पण इथे गावात आहेत का नोकऱ्या?'

'आम्हाला विकास हवा आहे, पण निसर्गाचा समतोल साधून विकास'

'दशावतार' सिनेमातले हे काही संवाद...

"भिंतीला चिरा गेल्या. जमिनीला गेल्या. घरं हालतात. त्या खाणवाल्यांना सांगितलं की जरा कमी करा तरी ते करत नाहीत. उलट जास्त करू लागले. रात्रीसुद्धा करायचे. मग आम्ही काय करायचं?"

"आमचं घर डोंगराजवळच आहे. तो डोंगर तर अर्धा गेलाच आहे. आता त्याची कंपनं इकडं जाणवतात. गावात अनेक घरांचं असं झालं आहे. कधी काय होईल सांगता येत नाही."

या वर्षीच्या मार्च महिन्यात सिंधुदुर्गमधल्या दोडामार्ग तालुक्यातल्या काही गावांच्या लोकांनी जवळच असलेल्या तिलारी या धरणाच्या पाण्यापाशी बसून उपोषण सुरू केलं. हे उपोषण होतं इथलं धरणाजवळचं जंगलपट्ट्यातलं खाणकाम थांबावं म्हणून.

Ocean Film Company दिलीप प्रभावळकरांनी वयाच्या या टप्प्यावर साकारलेली एक वेगळी भूमिका देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

दशावतार सिनेमाचे संवाद आणि दोडामार्गमधल्या उपोषणाचा संबंध काय असं तुम्हाला वाटू शकतं? तर संबंध आहे. कारण दोडामार्ग किंवा कोकणातल्या इतर भागातले गावकरी जे भोगत आहेत त्यावरच हा सिनेमा थेट भाष्य करतो.

सध्या या सिनेमाची प्रचंड चर्चा सुरू आहे. मराठीतला एक वेगळा प्रयोग, दिलीप प्रभावळकरांनी वयाच्या या टप्प्यावर साकारलेली एक वेगळी भूमिका, दाक्षिणात्य सिनेमांसोबतची विशेषतः कांतारासोबत होणारी तुलना, सिनेमा म्हणून जमलेल्या तर काही फसलेल्याही बाजू अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर याबद्दल लिहिलं, बोललं जात आहे.

सिनेमा म्हणून दशावतार कसा आहे, याची चर्चा होत असतानाच सिनेमा म्हणून तो काय सांगतो, याबद्दलही बोलणं सध्याच्या घडीला आवश्यक ठरतं.

कारण प्रेम, लग्न, रिलेशनशिप इश्यू, कॉमेडी याच्या पलीकडे जात 'दशावतार' आपल्या आजूबाजूच्या वास्तवाला हात घालतो.

निसर्ग आणि आपलं नातं, जी किंमत मोजून आपण विकास करत आहोत त्यातून भविष्यात हाती काय लागणार आहे, हे प्रश्न विचारत असल्याने कथा कोकणातली असली तरी एका टप्प्यावर ती तुमच्या आमच्या आयुष्याशीही येऊन भिडते. आणि म्हणूनच हा सिनेमा महत्त्वाचा ठरतो.

दशावतार, निसर्ग, कातळशिल्पं आणि खाणी

ही गोष्ट आहे दशावतार सादर करणाऱ्या बाबुली मिस्त्रीची. थकलेला, निसर्गात रमणारा, एकुलत्या एक मुलाशिवाय दुसरं जग नसलेला बाबुली. गावात चक्रम म्हणूनच त्याची ख्याती. पण हाच 'हाफ मॅड' बाबुली जेव्हा दशावतारासाठी रंगमंचावर येतो, तेव्हा त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा संचारते.

आजूबाजूच्या जगाचं त्याचं भान गळून पडतं. त्याच्या आयुष्यात एक वळण येतं आणि याच 'दशावतारा'चा आधार घेत तो त्याचा मार्ग निवडतो. याहून अधिक सिनेमाची कथा सांगणं योग्य नाही.

दशावतार ही तळकोकणातल्या बहुतांश भागात सादर होणारी लोककला. ती इथल्या सामान्य माणसाच्या आयुष्याशी, आस्थेशी जोडलेली.

सिनेमातला बाबुली दशावतार म्हणजे देवाचं काम असं म्हणत ज्या श्रद्धेनं दशावतार साकारतो, तितक्याच श्रद्धेनं कोकणातली माणसं ही लोककला पाहतात, त्यातल्या पात्रांमध्ये आपली श्रद्धास्थानं शोधतात.

Ocean Film Company गेल्या दशकभराच्या काळात कोकणपट्ट्यात, विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये हजारोंनी कातळशिल्पं मिळाली.

दशावताराप्रमाणेच निसर्गही कोकणी माणसाच्या जगण्याचा भाग आणि त्याच्याशी जोडलेल्या लोककल्पनाही.

गेल्या काही वर्षांत कोकणातली कातळ शिल्पंही चर्चेत आहेत. गेल्या दशकभराच्या काळात कोकणपट्ट्यात, विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये हजारोंनी कातळशिल्पं मिळाली.

कातळशिल्पं म्हणजे खडकांच्या पृष्ठभागावर कोरलेली चित्रं. त्यांना खोदशिल्पं आणि इंग्रजीत 'पेट्रोग्लिफ्स' किंवा 'जिओग्लिफ्स' असंही म्हटलं जातं. या दोन जिल्ह्यांमध्ये मिळून जवळपास 1700 कातळशिल्पं मिळाल्याची नोंद झाली आहे.

या सगळ्या गोष्टी एकात एक गुंफत बाबुलीची ही कथा पुढे जाते. यातली प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणेही एखाद्या कथेचा विषय होऊ शकते. पण दशावतारमध्ये हे सगळे मुद्दे एकत्र आले आहेत.

राखणदार, कातळशिल्पं, जंगल सिनेमातल्या जणू व्यक्तिरेखा बनून कथेला पुढे नेतात आणि शेवटाकडे जाताना आपल्याला एका प्रश्नापाशी नेऊन सोडतात...आपल्याला नेमका कसा विकास हवा आहे?

जल, जंगल, जमिनीचा प्रश्न आणि कोकण

लेखाच्या सुरूवातीला आलेला दोडामार्गमधला प्रकल्प. इथे जवळच तिलारी धरण आहे. पण धरणाची आणि जंगलाची, दोन्हीची पर्वा न करता इथं खाणकाम सुरू आहे.

स्थानिकांसमवेत गेली अनेक वर्षं इथलं पर्यावरण वाचवण्यासाठी काम करणारे तज्ज्ञही विचारतात की अशा ठिकाणी खाणकामाची परवानगी दिलीच कशी?

इथले डोंगर खाणकामामुळे उघडे-बोडके झाले आहेत. याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट तुम्ही इथे वाचू शकता.

रत्नागिरीतल्या बारसू रिफायनरीला झालेला विरोध, आंदोलन तर राज्यभर गाजलं. बारसू, गोवळ, देवाचं गोठणं, सोलगांव अशा गावांचा परिसर, त्यांच्या वाड्या, भवतालचे सडे हा या प्रकल्पासाठी निवडला होता.

Sharad Badhe/BBC रत्नागिरीतल्या बारसू रिफायनरीला झालेला विरोध, आंदोलन तर राज्यभर गाजलं.

या प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम तर चर्चेत होतेच. पण त्याचबरोबर या भागातला मानवी संस्कृतीचा एक महत्वाचा ठेवा असं म्हटली गेलेली, सड्यावरच्या जांभ्या खडकावर कोरली गेलेली शेकडो कातळशिल्पं आहेत. त्या कातळशिल्पांचं काय होणार हा प्रश्नही उपस्थित होत होता.

कोकणातले जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, केमिकल झोन याला झालेले विरोध, आंदोलनंही कायम चर्चेत राहिली.

जल, जंगल, जमिनीच्या मुद्द्यावर गेली अनेक वर्षं कोकणवासी जो लढा देत आहेत, तोच बाबुलीच्या रुपानं दशावतार मांडतो.

कोकणातले हे प्रकल्प, त्याचं बदलतं रूप हे 'दशावतार'चे लेखक आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी स्वतः अनुभवले आहेत. त्या सगळ्या वैयक्तिक अनुभवांचं प्रतिबिंब 'दशावतार'मध्ये पडलं आहे.

'अजून दहा वर्षांनी असं कोकण दिसणार नाही'

बीबीसी मराठीशी बोलताना सुबोध यांनी सांगितलं की, "माझं गाव कोकणातलं. वेंगुर्ल्यातलं केळूस गाव माझं आजोळ. आमचं तिथे शंभर वर्षं जुनं घर आहे. 2020-21 साली मी या घरावर डॉक्युमेंट्री करायला गेलो होतो. एकदा रात्रीच्या वेळी मी आणि मामा बसलो होतो. तेव्हा रस्त्यावरून लाकडाने भरलेले ट्रक दिसणं वाढलंय या विषयावर बोलताना माझा मामा म्हणाला की, अजून दहा वर्षांनी तुला असं कोकण दिसणार नाही. साठवून घे. मला तिथे कोकणातल्या बदलाची जाणीव झाली."

त्यांनी पुढे सांगितलं की, " खरंतर कोकणातला निसर्ग हा आमचा जगण्याचाच भाग आहे. पर्यावरण, निसर्गरक्षण असं त्याला शिकवावं लागत नाही. इथे ब्राह्मणभोजनाची परंपरा आहे. ही परंपरा म्हणजे काय तर वडाच्या झाडाला ब्राह्मण म्हणायचं आणि त्याखाली बसून सगळ्यांनी एकत्र जेवायचं. तसं गोठ्यात जेवायची पण परंपरा आहे. गोठा स्वच्छ करून, सारवून गाई-गुरांच्या सहवासात जेवण करायचं. प्रत्येक गावात देवराई असते. पर्यावरणरक्षण असं सांगावं-शिकवावं लागत नाही."

Getty Images कोकणातला निसर्ग हा आमचा जगण्याचाच भाग आहे. पर्यावरण, निसर्गरक्षण असं त्याला शिकवावं लागत नाही, 'दशावतार'चे दिग्दर्शक सुबोध खानोलकर सांगतात

"पण गेल्या 20-25 वर्षांत कोकण झपाट्याने बदलतोय. डोंगर बोडके होताहेत. विकास हवा आहे. पण निसर्गाचा समतोल राखून होत असेल तरच, सिनेमातही मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे," असं सुबोध यांनी म्हटलं.

मग या सगळ्यात 'दशावतार' कुठून आला, याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, दशावतार हा कोकणातल्या माणसाच्या जगण्याचा भाग आहे.

मी अगदी लहानपणापासून दशावतार पाहात आलो आहे. माझ्या मनात दशावताराची गोष्ट सांगायचं होतंच. केवळ दशावतारची डॉक्युमेंट्री तर करायची नव्हती. त्यातून हे कथानक मला प्रवासात सुचलं.

'माझं स्टेटमेंट पॉलिटिकल नाही, ते भावी पिढीसाठी'

'दशावतार' हा कोकणातल्या खाण प्रकल्पांबद्दल बोलतो. विनाश करून विकास नको असं म्हणत थेटपणे खाणींना विरोधाची भूमिका या सिनेमातून घेतली आहे.

सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत हे थेट स्टेटमेंट करणं किती धाडसाचं होतं, या प्रश्नावर उत्तर देताना सुबोध यांनी म्हटलं की, "मी खरंतर असा विचार केलाच नाही. मुळात मी कोणाला विरोध करतोय, काही पॉलिटिकल स्टेटमेंट करतोय असं माझ्या मनातही नव्हतं."

"मला केवळ बाबुली मिस्त्रीची, त्याच्या निसर्गावर असलेल्या श्रद्धेची, त्यासाठी त्याने दिलेल्या लढ्याची आणि त्यामध्ये आजूबाजूचे लोक कसे सहभागी होत जातात याची गोष्ट सांगायची होती."

"आपण विकासाचा विचार करतो तेव्हा केवळ आजच्याच पिढीचा विचार करतो. पण आपण भावी पिढीला काय देणार आहे याचा विचारही करायला हवा, हे मला वाटतं. मला हेच स्टेटमेंट करायचं होतं," असंही सुबोध यांनी म्हटलंय.

'कोकण म्हणजे लाल मातीचे रस्ते, निसर्ग; पण...'

प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांनी 'दशावतार'चे संवाद लिहिले आहेत. गुरू ठाकूर सुद्धा कोकणातले. खाणींमुळे कोकणातल्या पर्यावरणाची झालेली हानी त्यांनी पाहिली आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, "माझं गाव तळकोकणातलं आहे. गेली जवळपास कित्येक वर्षं मी या भागात खाणकाम होताना पाहतोय. रेडी येथील खाण प्रकल्प जवळपास 50 वर्षाहून अधिक जुना असेल. कोकण म्हटल्यावर हिरवा निसर्ग, लाल मातीचे रस्ते असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. पण रेडीच्या (वेंगुर्ल्यातलं एक गाव) गणपतीला जाताना रस्ते, झाडं सगळं काळी झालेली दिसतात. नको तो प्रवास असं वाटतं."

"कोकणात मँगनीज खनिजाचे साठे आहेत. त्यासाठी इथे अनेक खाणकाम प्रकल्प येऊ घातले आहेत. पण त्यामुळे इथली जंगलं उद्ध्वस्त होत आहेत. पाण्याच्या स्रोतांचं नुकसान होईल. आणि गावांचा चेहरा मोहरा भकास होईल याची प्रचंड भीती स्थानिकांमध्ये आहे. विकास आणि निसर्ग यांच्यातला समतोल कसा साधता येईल याबाबत लोकजागृतीच व्हायला हवी. दशावतारमध्येही हेच दाखवलं आहे," असं गुरू ठाकूर यांनी म्हटलं.

Ocean Film Company 'दशावतार' हा कोकणातल्या खाण प्रकल्पांबद्दल बोलतो. विनाश करून विकास नको असं म्हणत थेटपणे खाणींना विरोधाची भूमिका या सिनेमातून घेतली आहे.

आमचा प्रगतीला विरोध नाही, पण ती कशी व्हायला पाहिजे याचं भान हवं हा मुद्दाही ते मांडतात.

"नाण्याच्या दोन बाजू असतात कधीकधी अशा प्रकल्पांना विरोध केला तर लोकांच्या भावनाही दुखावतात. कारण हे प्रकल्प रोजगार घेऊन येतात. त्यामुळे लोकांना ते हवेही असतात."

पण आता रोजगार मिळाला तरी पुढे काय, याचा दूरगामी विचार व्हायला हवा, असं सांगताना ते गोव्यातील काही गावाचं उदाहरण देतात.

"इथे स्थानिकानी एक होऊन प्रचंड विरोध केल्यामुळे गोव्यातलं बरेचसे मायनिंग 2018 पासून बंद करण्यात आलेत. पण, त्याआधी जे काही मायनिंग झालंय त्यामुळे इथंली अनेक गावं ओसाड झाली आहेत. खाणकामामुळे इथल्या निसर्गसंपदेची मोठी हानी झालीय."

पुढे ते म्हणतात, "मायनिंगचा फक्त निसर्गावरच नाही, तर जनमानसावरही मोठा परिणाम झालाय. पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी स्थानिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय दुसरा पर्याय नसतो. 'दशावतार'मध्येही हीच लोकभावना जागृत होताना दाखवलीय, प्रगती आणि पर्यावरण दोन्हीचा समतोल साधून निसर्ग जपा, हा संदेश मनोरंजनाच्या माध्यमातून दिला आहे."

'कांताराशी तुलना होणार याची कल्पना होती, पण...'

'दशावतार'चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर हा सिनेमा 'कांतारा'सारखाच आहे का, त्याची कॉपी आहे की 'कांतारा'चा त्यावर केवळ प्रभाव आहे, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याला कारणही होतं.

जंगल, जंगलाशी जोडलेलं मिथक, लोककलेचा वापर अशी अनेक साम्यस्थळं दोन्ही सिनेमात दिसत होती. मला स्वतःलाही ती जाणवली होती, पण सिनेमा पाहिल्यावर कथेचा गाभा वेगळा असल्याचं स्पष्ट झालं.

Ocean Film Company 'दशावतार'चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर हा सिनेमा 'कांतारा'सारखाच आहे का, अशी चर्चा होतेय.

सुबोधने याबद्दल म्हटलं की, "गोष्ट सुचली तेव्हा मला जाणवलं नाही. पण जेव्हा ब्रॉडर पर्सपेक्टिव्हने अनेकांना ऐकवलं तेव्हा मला म्हटलं की, अरे हे 'कांतारा'सारखं वाटतंय का...पण जर आपण अगदी दीव-दमणपासूनचा किनारपट्टीचा प्रदेश पाहिला तर तिथली लोकसंस्कृती बरीचशी सारखी आहे, लोककलांमध्येही साम्य आहे."

"कांतारा आणि दशावतारमध्येही तितकंच साम्य आहे. पण माझी गोष्ट ही बाप-मुलगा-निसर्ग आणि दशावतार या चार गोष्टींभोवती फिरते. लोककलेबद्दल बोलते. त्यामुळेच कांताराशी तुलना होऊ शकते ही कल्पना असली तरी ती रिस्क घेतली", असंही सुबोधने पुढं म्हटलं.

सोशल मीडियावर चर्चा

एकीकडे सोशल मीडियावर सिनेमाची आशय-मांडणीच्या दृष्टीने चर्चा होत आहे.

अभिनयाबरोबरच तंत्रज्ञानाचा उत्तम वापर, कॅमेरा वर्क, व्हीएफएक्स, संकलन या तांत्रिक बाजूतही सिनेमा उजवा आहे. त्याबद्दल त्याचं कौतुकही होतंय. पण दुसरीकडे कथेच्या मांडणीत काही कच्चे दुवेही आहेत.

मात्र, या सिनेमॅटिक गोष्टींपेक्षाही सिनेमा जे सांगतोय ते अनेकांना महत्त्वाचं वाटत आहे.

अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी याविषयी एक पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "प्रचंड भांडवल घालून मेनस्ट्रीममध्ये चित्रपट प्रदर्शित करताना आपल्याला घातलेले पैसे परत मिळून नफा झाला पाहिजे हा अॅप्रोच 'दशावतार'च्या निर्मात्यांनी ठेवला असला तर त्यात काही गैर नाही. त्यामुळे चित्रपटातील काही खटकलेल्या भागाकडे मी दुर्लक्ष करू इच्छितो."

या पोस्टमध्ये पुढे त्यांनी असंही म्हटलंय की, "'दशावतारा'च्या टीमने जे यशस्वीपणे पोचवले आहे, त्यांनी जो राजकीय मेसेज दिला आहे ते अधिक महत्वाचे आहे. हल्ली सेफ खेळण्याच्या जमान्यात, फारसे कोणी राजकीय भूमिका घेत नसताना, या तरुणांनी जो प्रयत्न केला आहे तो खूप आश्वासक आहे."

"पर्यावरण आणि आर्थिक विकास यामध्ये जणू काही न मिटवता येणारे द्वंद्व आहे, पर्यावरणाला प्राधान्य दिले पाहिजे अशी मांडणी करणारे अर्बन नक्षल देशाला अविकसित ठेवू पाहतात अशी बुद्धिभेदी मांडणी अनेक वर्ष केली गेली आहे.

अशा काळात 'औद्योगिक प्रकल्प' की 'पर्यावरणाचा कायमचा नाश' असे द्वंद्व जेथे असेल तेथे आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी उभे राहू हे हा चित्रपट निसंदिग्धपणे सांगू इच्छितो."

Ocean Film Company अभिनयाबरोबरच तंत्रज्ञानाचा उत्तम वापर, कॅमेरा वर्क, व्हीएफएक्स, संकलन या तांत्रिक बाजूतही सिनेमा उजवा आहे. त्याबद्दल त्याचं कौतुकही होतंय.

ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनीही सिनेमाच्या विषयाबद्दल बोलताना म्हटलं की, "कोकणाच्या लाल मातीतला सिनेमा आहे हा. लाल मातीतलीच बापलेकाच्या मायेची गोष्ट. इथलीच भाषा. इथला निसर्ग. इथली माणसं. इथलीच संस्कृती. सगळं भरभरून येतं यात. त्यातून आजच्या कोकणाच्या विकासाच्या मुद्द्यावर भूमिका घेऊन हा सिनेमा मैदानात उतरतो. जमिनीवर पाय असलेल्या माणसांनी बनवलेला हा सिनेमा फक्त कोकणापुरता उरलेला नाही. मोअर लोकल, मोअर ग्लोबल. रखवालदार दुसरं कुणी नाही, तुम्ही आम्हीच असतो, ही गोष्ट फक्त कोकणाची उरतच नाही, ती जगाची बनते."

अशाच आशयाच्या पोस्ट वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी लिहिल्या आहेत.

सिनेमा हे मनोरंजनाचंच साधन मानलं जातं. त्यामुळे भूमिका घेऊन सिनेमा बनवणं हे काम धाडसाचंच. त्यात आर्थिक जोखमीचा भाग येतो किंवा एका विशिष्ट पद्धतीच्या सिनेमाचा शिक्का बसू शकतो.

अशावेळी 'दशावतार'सारखा सिनेमा जेव्हा ही दोन्ही आव्हानं पेलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याबद्दल बोललं जाणं स्वाभाविक होतं.

महात्मा गांधींचं एक वाक्य आहे - The world has enough for everyone's need, but not enough for everyone's greed.

विकास करताना खरंच गरजांचा विचार करतो की अधिकचा हव्यास करतोय हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायची वेळ आली.

'दशावतार' प्रेक्षकांना या प्रश्नापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आणि म्हणूनच सिनेमॅटिक व्हॅल्यूच्या पलिकडे जाऊन या सिनेमाकडे पाहिलं जात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • मराठी सिनेमा, जात वास्तव आणि तमीळ सिनेमाशी तुलना
  • सामना : 'मारुती कांबळेचं काय झालं?' हे विचारण्याचं धाडस दाखवणारा 50 वर्षांपूर्वीचा 'कल्ट सिनेमा'
  • मित्राला आणू नको म्हटल्यावर संघाच्या शाखेत जाणं का बंद केलं? असे होते अभिनयापलीकडचे निळू फुले
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.