कोण आहे स्वामी चैतन्यनंद सरस्वती? 17 विद्यार्थिनींना अश्लील मेसेज, बळजबरी शारीरिक संबंध आणि…, अखेर धक्कादायक सत्य समोर
Tv9 Marathi September 25, 2025 01:45 AM

Who is Swami Chaitanyananda Saraswati: दिल्ली येथील वसंत कुंज येथे श्री शारदा इंस्टीट्यूट मॅनेजमेंट (Sri Sharada Institute of Indian Management) आहे. या इंस्टीट्यूटचा स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्यावर येथील 17 विद्यार्थिनींवर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याते आरोप केले आहेत. तक्रार मिळाल्यानंतर, वसंत कुंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पण आरोपी सध्या दिल्ली येथून फरार आहे. पोलीस आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्या शोधात आहे. पोलिसांना त्याचं शेवटचं लोकेशन आग्रा येथील असल्याचं कळालं आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती ओडिसा येथील राहणारा आहे. त्याच्या विरोधात याआधी देखील लैगिंक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2009 आणि 2016 मध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा डिफेन्स कॉलनीत आणि दुसरा वसंत कुंज उत्तर येथे दाखल करण्यात आला.

10 वर्ष आरोपीच्या खांद्यावर इंस्टीट्यूटची जबाबदारी

स्वामी चैतन्यनंद सरस्वती गेल्या 10 वर्षांपासून वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटची जबाबदारी सांभाळत होता. धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर इंस्टीट्यूटच्या बेसमेंटमधून वोल्वो कार जब्त देखील करण्यात आली आहे. श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट कर्नाटकातील शृंगेरी पीठांतर्गत कार्यरत आहे. कर्नाटकातील शृंगेरी येथील दक्षिणमय श्री शारदा पीठाने स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचं आचरण अयोग्य आणि पीठाच्या हिताच्या विरुद्ध असल्याचं म्हटलं आहे. या कारणास्तव त्याच्याशी असलेले सर्व संबंध संपवण्यात आले.

17 विद्यार्थिनींनी केले गंभीर आरोप

4 ऑगस्ट 2025 मध्ये स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्या विरोधात वसंत कुंज ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी पीजीडीएम शिकणाऱ्या महिला विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान, 32 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, त्यापैकी 17 जणांनी स्पष्टपणे आरोप केला आहे की स्वामींनी त्यांना अश्लील मेसेज पाठवले आणि शारीरिक छळ देखील केला. एवढंच नाही तर, महिला कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थिनींवर दबाव टाकत स्वामींच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितलं.

दक्षिण पश्चिम दिल्लीच्या अतिरिक्त डीसीपी ऐश्वर्या सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या पीजीडीएम विद्यार्थ्यांनी लैंगिक छळाची तक्रार केली होती. आरोपी चैतन्यानंद सध्या फरार आहे. पीडित विद्यार्थिनींच्या सुरक्षेची देखील जबाबदारी घेण्यात आली आहे. आतापर्यंत पटियाला हाऊस कोर्टात 16 विद्यार्थिनींचे जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.