प्रथमोपचाराविषयी विशेष प्रशिक्षण
नेरूळ, ता.२४ (बातमीदार) ः स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत विविध उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये स्वच्छताकर्मींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यानुसार ज्ञानकेंद्र येथे सफाईमित्र सुरक्षा शिबीर पार पडले.
यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभाग व सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग यांच्या माध्यमातून सफाई मित्रांना प्रथमोपचार व हृदय पुनरूज्जीवन प्रशिक्षण देण्यात आले. आधार ॲबिलिटी फाउंडेशन यांच्या माध्यमातून अनुबंध या वैद्यकिय क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या वतीने सफाईमित्रांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
यामध्ये २०० हून अधिक सफाईमित्रांनी सहभाग घेऊन वैद्यकिय आपत्तीच्या प्रसंगी तातडीने करावयाच्या मदतीचे प्रशिक्षण घेतले. सहभागी सफाईमित्रांना यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या हस्ते, डॉ.नितीन राठोड यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्रके प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले.
हे शिबिर अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, उपायुक्त डॉ. अजय गडदे, उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आधार ॲबिलीटी फाउंडेशनच्या डॉ. सोनल सिंग व डॉ. विनिता सुर्यवंशी यांनी उपस्थित सफाईमित्रांशी संवाद साधत वैद्यकिय आपत्ती उद्भवल्यास मदत कार्याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.