छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न
esakal September 25, 2025 04:45 AM

रायगडावर द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून रायगडावर ३५२वा सोहळा उत्साहात
माणगाव, ता. २४ (वार्ताहर) ः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर दोन वेळा राज्याभिषेक करवून घेतला होता. पहिला राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी तर द्वितीय २४ सप्टेंबर १६७४ रोजी पार पडला. पहिला राज्याभिषेक साजरा होतोय मात्र द्वितीय सोहळा विस्मरणात गेला होता. गेल्या १० वर्षांपासून संभाजी ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून या द्वितीय राज्याभिषेकाचा उत्सव साजरा करण्यात येतो आहे.
यंदाही पुरातत्त्व आणि प्रशासनाच्या परवानग्या मिळवून संभाजी ब्रिगेडने रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२वा द्वितीय (शाक्त) राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी राज्यातील अतिमुसळधार पावसामुळे अडचणीत आलेल्या मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मदत करण्याचा संदेश दिला गेला. हा राज्याभिषेकाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवभक्तांनी रायगडावर उपस्थिती लावली होती. या वेळी संपूर्ण परिसर शिवरायांच्या जयघोषाने दणाणून गेला.
संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंत देसाई, कोकण अध्यक्ष सुभाष सावंत, कोकण कार्याध्यक्ष विश्वनाथ मगर, सोहळा समितीचे अध्यक्ष संतोष कदम, रायगड (द.) जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशरफ पठाण, जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हा प्रवक्ता अपर्णा खांडेकर, जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हा सचिव ज्योती सावंत, सांगली जिल्हा जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष जान्हवी पाटील, जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हा कोषाध्यक्ष मृणाल पवार, महाड तालुकाध्यक्ष कैलास अटक, यश घोसाळकर, मनीष सावंत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, रायगडावरील वैभव सुर्वे यांचे चिरंजीव वेध वैभव सुर्वे यांनी साकारलेली हुबेहूब बाळ शिवाजी महाराजांची वेशभूषा या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.