पुणे, ता. १३ : रिझवान ऊर्फ टिपू पठाण टोळीने सय्यदनगर परिसरातील एका महिलेची जमीन बळकावून तिचा ताबा देण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी पठाणसह त्याच्या नऊ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मुंबईतील कुर्ला नौपाडा येथील ३१ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, या प्रकरणी टिपू सत्तार पठाण, सादिक कपूर, एजाज सत्तार पठाण, मेहबूब अब्दुल गफार शेख, जावेदगणी शेख, सद्दाम सलीम पठाण, साजिद झिब्राइल नदाफ, इरफान नासीर शेख, अजीम ऊर्फ अंट्या महम्मद शेख आणि मतीन हकीम सय्यद (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, सय्यदनगर भागात महिलेच्या मालकीची जमीन आहे. पठाण टोळीने या जागेवर बेकायदा पत्र्याचे शेड उभारले. यानंतर त्यांनी ती जागा एकाला भाडेतत्त्वावर देऊन त्याच्याकडून दरमहा भाडे वसूल केले. तक्रारदार महिलेने जमीन रिकामी करण्याची मागणी केली. त्यावेळी पठाण ने तिला ‘२५ लाख रुपये दिल्यास ताबा सोडतो, अन्यथा पुन्हा या भागात पाय ठेवला तर जीवे मारू,’ अशी धमकी दिली.
काळेपडळ पोलिसांनी पठाण आणि साथीदारांच्या बँक खाती नुकतीच गोठविली आहेत. तसेच, त्यांच्या घरांवर छापे टाकून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, पंखे, टीव्ही, वॉशिंग मशिन, फर्निचर असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापूर्वीही पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने पठाण टोळीच्या बेकायदा बांधकामावर कारवाई केली होती. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या सूचनेनुसार पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील करीत आहेत.