एमआयडीसीविरोधात संतापाची लाट
esakal October 14, 2025 11:45 AM

एमआयडीसीविरोधात संतापाची लाट
चिंध्रण, कानपोली, महालुंगीतील महिलांचे आंदोलन
पनवेल, ता. १३ (बातमीदार)ः पनवेल तालुक्यातील चिंध्रण, कानपोली, महालुंगी गावातील ग्रामस्थांनी प्रस्तावित एमआयडीसीविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे, पण आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने संतप्त महिलांनी थेट पाण्याच्या टाकीवरून चढून निषेध केला आहे.
एमआयडीसीसाठी संपादित झालेल्या जमिनींसाठी वाढीव दराने नुकसानभरपाई देणे, प्रकल्पग्रस्तांना भूखंड आणि इतर हक्काचे लाभ देणे, न्यायालयीन प्रकरणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. तरी प्रशासनाकडून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारच्या उदासीनतेविरोधात आज गावातील महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. या वेळी आंदोलकांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील. गरज पडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.