खालापुरात प्रस्थापितांचा हिरमोड
esakal October 14, 2025 11:45 AM

खालापुरात प्रस्थापितांचा हिरमोड
पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत जाहीर
खालापूर, ता. १३ (बातमीदार)ः पंचायत समितीच्या आठ गणांपैकी दोन अनुसूचित जमातींसाठी, मागास प्रवर्गासाठी दोन, सर्वसाधारण चार जागा आरक्षित असून, आठपैकी चार जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या चेहऱ्यांवर आनंद, तर प्रस्थापितांचा हिरमोड झाला आहे.
खालापूर तालुक्यात हाळखुर्द, आत्करगाव, खानाव, सावरोली, वाशिवली, वासांबे रीस आणि चौक, असे आठ गण आहेत. त्यापैकी अनुसूचित जमातीसाठी दोन, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दोन आणि सर्वसाधारण चार जागा आरक्षित असून, आठपैकी चार जागा महिलांसाठी राखीव आहेत. चौक, हाळखुर्द गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. मागास प्रवर्गासाठी वाशिवली, वासांबे गण आरक्षित असून, उर्वरित खानाव, रिस, सावरोली, आत्करगाव गण सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले असून, वाशिवली, सावरोली, आत्करगाव महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
-----------------------------------
राजकीय नेत्यांची पाठ
तीन वर्षांनी होत असलेल्या आरक्षण सोडतीसाठी राजकीय नेते कार्यकर्ते यांची उपस्थिती तुरळक होती. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून, विशेष म्हणजे खालापूर पंचायत समितीच्या आठ पैकी चार जागा महिलांसाठी राखीव असताना राजकीय पक्षाची एकही महिला उपस्थित नव्हती. अनुसूचित जातीची लोकसंख्या पुरेशी नसल्याने त्यासाठी एकही जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.