rat11p17.jpg-
98273
मंडणगड ः पाककृती प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा समूह.
-------
धान्यांच्या रांगोळ्यांमधून पोषणाचा उद्बोधक संदेश
मंडणगडमध्ये ‘पोषण महिना’ उपक्रम; जिल्हा परिषद सीईओंकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १३ ः धान्यांपासून रेखाटलेल्या रांगोळ्या केवळ कलात्मक नाहीत, तर पोषणाचा उद्बोधक संदेश देणाऱ्या आहेत. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कल्पकतेचे हे जिवंत उदाहरण असल्याचे कौतुकोद्गार रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी काढले. राष्ट्रीय पोषण महिना व पोषण महाअभियानांतर्गत पंचायत समितीतर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पाककृती व रांगोळी प्रदर्शन झाले.
उद्घाटनप्रसंगी कार्यकारी अधिकारी विजयसिंग जाधव, उपमुख्य अधिकारी सागर पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) मल्लिनाथ कांबळे, गटविकास अधिकारी सुनील खरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे आदी उपस्थित होते. मंडणगडमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोषणमूल्य असणाऱ्या विविध धान्यांपासून आकर्षक रांगोळ्या साकारल्या. स्थानिक खाद्यपदार्थांच्या पोषणमूल्य दर्शवणाऱ्या पाककृतींचे प्रदर्शनही भरवण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला व बालआरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासह स्थानिक अन्नधान्यांचे पोषणमूल्य अधोरेखित करण्यात आले. रांगोळ्यांद्वारे धान्यही आरोग्याचा सण होऊ शकतो, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.