सदर-आदिम बियाणांची साठवणूक भाग २
esakal October 14, 2025 12:45 PM

rat13p1.jpg -
98213
कुणाल अणेराव
-----------
आदिम बियाणांची साठवणूक भाग २

- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टीज्ञान संस्था


पेव हा शब्द ''खड्डा'' या अर्थाच्या ‘पेयडू/पोयडू’ या कानडी शब्दापासून तयार झाला आहे. पेव म्हणजे जमिनीमधून पाणी झिरपून आत येणार नाही, असे तयार केलेले गोदाम. पेव तयार करण्यासाठी जमिनीमध्ये ठराविक खोलीपर्यंत गोल खड्डा खणत. त्याच्या आतील बाजूने मुख्यतः पांढऱ्याशुभ्र चिकणमातीचा वापर केला जात असे. कारण, या मातीत पाणी कमी प्रमाणात झिरपते तसेच ही माती ढासळत नाही. धान्य भरण्याच्यावेळी पेव आतून शेणामातीने सारवून घेत. पेवाच्या तळाशी उसाच्या वाळलेल्या पेंढ्या टाकत. त्यावर शिंदीच्या पानांपासून तयार केलेल्या चटया अंथरून मधल्या भागात धान्याची पोती रिकामी करत. पेवाच्या झाकणापासून खाली कमीत कमी ४ फुटांचा थर मोकळा ठरवला जात असे. एका पेवात साधारणतः १५० ते २५० क्विंटलइतके धान्य मावत असे. आतील धान्य काढायचे असेल तर एक व्यक्ती सहज प्रवेश करू शकेल, असा मार्ग असायचा. पेवामध्ये उतरण्यासाठी व चढण्यासाठी दोराचा वापर केला जात असे. वेळेनुसार आवश्यक तेवढे धान्य काढले जात असे. धान्य बाहेर काढण्याच्या वेळी पेवाचे तोंड मोकळे करून बराच वेळपर्यंत उघडे ठेवून पेवात बाहेरची मोकळी हवा मिसळू देत.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये आजही नवीन घराचे अथवा इमारतीचे बांधकाम करताना अशी अनेक पेवं आढळून येतात. अकोले (जिल्हा- नगर) तालुक्याच्या ऐतिहासिक विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ल्यावरील एका गुहेत असे दोन पेव सापडले आहेत. विशेष म्हणजे त्यात सुमारे ५० पोते नाचणी आणि वरी असे धान्यही सापडले आहे. हे धान्य शिवकाळातील असावे, असा अंदाज व्यक्त होतो. अफवांचे पेव फुटले, असा शब्दप्रयोग आजही केला जातो. त्यातील पेव म्हणजे हेच. जर पेव फुटले तर त्यातून धान्य भसाभस बाहेर सांडते आणि धान्याची लूट होते. त्यानुसार अफवा भसाभस पसरत जातात, असा त्यामागील अर्थ आहे.
बळद म्हणजे घराच्या भिंतीला तिन्ही बाजूंनी मातीच्या विटांचे आयताकृती बांधकाम करून बनवलेली उभट रचना होय. याची उंची ५ ते ७ फुटांपर्यंत असून, यामध्ये ५०० किलो ते १ हजार किलोपर्यंत साठवणूक क्षमता असते. बळदाच्या समोरील बाजूस एक लहानसे छिद्र ठेवलेले असते. त्यातून आतील धान्य काढून घेता येते. हे छिद्र शेणमातीच्या मिश्रणाने बंद केले जाते. बळदाच्या वरचा भागसुद्धा शेणमातीच्या मिश्रणाने लिंपून बंद केला जातो आणि शक्यतो तो शेवटपर्यंत उघडला जात नाही. अशा हवाबंद रचनेमुळे आत ठेवलेले धान्य ओलावा आणि कीड यापासून मुक्त राहते. बळदामध्ये ठेवलेले धान्य तीन ते चार वर्षे सुरक्षित राहते. अकोले तालुक्यातील कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड परिसरात आजही बळद वापरात आहेत.
आदिमधान्यांच्या बियाणांची साठवणूक करताना या धान्याची संपूर्ण कणसेच माळ्यावर पारंपरिक पद्धतीने टांगून ठेवतात. ती साधारणपणे चुलीच्या वरच्या भागात असतात. चुलीचा मंद धूर आणि उष्णतेमुळे कणसे ओलसर राहात नाहीत, त्यांना बुरशी-कीड लागत नाही. उंदीरही ही कणसे खात नाहीत. त्याचप्रमाणे कोकणात भाताच्या बियाणांच्या साठवणुकीसाठी गवताची ‘मुडी’ बांधली जात असे. मुडी म्हणजे गवत आणि दोरी वापरून धान्याची नैसर्गिकरित्या साठवण करून ठेवण्याचं एक साधन. मुडी ही भाताची मळणी केल्यावर मिळणाऱ्या गवताची बांधली जाते. हे मोठं कौशल्याचं आणि ताकदीचंही काम आहे. मोठी मुडी ही दहा कुढवांची बांधली जाते तर अगदी लहान म्हणजे दोन-तीन कुडू धान्याच्या मुडीला ‘बिवळा’ म्हणतात. या मुडी भात, आदिमधान्ये, कडधान्ये यांच्या बियाणांच्या साठवणुकीसाठी बनवल्या जात. बियाणी तसेच धान्य टिकण्यासाठी गवतात काळा कुडा आणि निर्गुडीची पानेही टाकली जात असत. एखाद्या मुडीतले धान्य दोन-अडीच वर्षांपर्यंतही उत्तम स्थितीत राहत असे.
धान्य आणि बियाणी साठवणुकीची ही साधने त्या वेळी आपल्या आसपास सहज उपलब्ध असलेल्या सामुग्रीपासून बनवली जात होती. जसे की, बांबू, शेणमाती, गवत इ. आता या गोष्टी इतक्या सहजतेने उपलब्ध होत नाहीत आणि हे बनवणारे कारागीरही कमी झाले आहेत. त्यामुळे अर्थातच हे सारे खर्चिक झाले आहे शिवाय बियाणी आणि धान्य हे आता थेट बाजारातून आणले जाते. त्यामुळे ही पारंपरिक साठवणुकीची साधने मागे पडत चालली आहेत. त्यापेक्षा प्लास्टिकची पिंपे खूपच स्वस्त पडतात; मात्र त्यात धान्य किंवा बियाणी साठवायची झाली तर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी एअर कंडिशनरसारखी यंत्रणा उभारावी लागते. याचा खर्च पाहता साठवणुकीची पारंपरिक साधने ही खूपच किफायतशीर आहेत. सतत बदलत्या हवामानामुळे पिकांचे आणि काढलेल्या धान्यांचे रक्षण करणे, ही खूप अवघड गोष्ट होत चालली आहे. कधी पाऊस येईल आणि तयार पीक किंवा काढलेले धान्य यांचा नाश होईल, याचा अंदाज बांधणे हवामानखात्यामुळे सोपे झाले असले तरी त्यांची योग्यप्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. तेथे अशा पारंपरिक साठवणुकीचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारे केलेल्या योग्य साठवणुकीमुळे शेतकरी योग्य भावाने योग्य फायदा मिळवून ग्राहकापर्यंत पोहोचू शकेल.

(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.