चिराग पासवान आशावादी असलेल्या 5 जागांवर जदयूचे उमेदवार, नितीशकुमार यांची मोठी खेळी
Marathi October 15, 2025 08:25 PM

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Election 2025) दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षातील राजद, काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएनं 12 ऑक्टोबरला जागा वाटप जाहीर केलं होतं. त्यानुसार जदयूला 101 जागा देण्यात आल्या होत्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूनं (JDU) 101 पैकी 57 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. चिराग पासवान (Chirag Paswan) आशावादी असलेल्या 5 जागांवर जदयूनं उमेदवार दिल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. जदयूच्या या खेळीचे एनडीएवर काय परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे.

चिराग पासवान: चिरग पासवान एक जगावर आहे ज्याने आशा केली

चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाचा मोरवा, सोनबरसा, राजगीर, गायघाट आणि मटिहानी या पाच जागांवर दावा होता. या ठिकाणी जदयूनं त्याचे उमेदवार दिले आहेत. या पाच जागा पूर्वी लोजपा (रामविलास) पक्षाकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

बिहार विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2020 मध्ये या पाचपैकी मोरवा आणि गायघाट विधानसभा मतदारसंघात राजदनं विजय मिळवला होता. तर, राजगीर आणि सोनबरसामध्ये जदयूनं विजय मिळवलेला. मटिहानी मध्ये लोजपाचा विजय झाला होता. मात्र, विजयी झालेले राजकुमार सिंह नंतर जदयूमध्ये गेले आहेत. जदयूनं या विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिल्यानं एनडीएमधील समन्वयावर परिणाम होणार का हे पाहावं लागेल. चिराग पासवान समर्थक काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल.

एनडीएमध्ये जनता दल यूनाएटेड 101 जागा लढवणार आहे. या 101 पैकी 57 उमेदवारांची घोषणा जदयूनं केली आहे. या 57 मध्ये 27 जुने उमेदवार आहेत. तर, 30 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जदयूच्या पहिल्या यादीत चार महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये मधेपुरातून कविता साहा, गायघाटमधून कोमल सिंह, समस्तीपूरमधून अश्वमेध देवी आणि विभूतीपूर येथे रवीना कुशवाहा यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान जदयूच्या पहिल्या यादीत तीन दबंग नेते आणि काही अनुभवी नेत्यांचा समावेश आहे. विद्यमान सरकारमधील पाच कॅबिनेट मंत्र्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री श्रवण कुमार यांना नालंदा मधून उमेदवारी देण्यात आली आहे. जसंपदा मंत्री विजय कुमार चौधरी यांना सरायरंजन, माहिती व जनसंपर्क मंत्री महेश्वर हजारी (कल्याणपूर) समाजकल्याण मंत्री  मदन साहनी यांना बहादरपूर आणि मंत्री  रत्नेश सदा यांना सोनबरसातून उमेदवारी देण्यात आली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचं जागावाटप

बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. या पैकी 101 जागा जदयू, 101 जागा भाजप, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) 29 जागा, हम पार्टीला 6 जागा आणि रालोमो या पार्टीला 6 जागा देण्यात आल्या आहेत. तर, भाजपनं पहिल्या यादीत 71 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.