मतदार याद्यांमध्ये घुसखोरी
पनवेलमध्ये दोन हजार ८०० दुबार नावे, शेकापची तक्रार
पनवेल, ता. १६ (बातमीदार)ः पालिका निवडणुकीची प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून मतदार याद्यांमधील गोंधळ, दुबार नावांवरून तक्रारींचा पाढा वाचत आहेत. अशातच पनवेल मतदारसंघातील नव्या मतदार याद्यांमध्ये तब्बल दोन हजार ८०० मतदारांची नावे दुबार नोंदवल्याचा खुलासा शेतकरी कामगार पक्षाने केला आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पनवेल मतदारसंघात विधानसभा निवडणुकीवेळी तब्बल २५ हजार ८५५ दुबार मतदार असल्याचा आरोप केला होता, मात्र त्यानंतरही निवडणूक आयोगाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे. कारण नव्या मतदार नावनोंदणी मोहिमेत दोन हजार ८०० नावे दुबार असल्याचा दावा शेकापकडून करण्यात आला आहे. याबाबतची लेखी तक्रार राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. नव्या मतदार यादीत पावणेसात लाखपैकी साडेपाच लाख मतदार मतदान करणार आहेत, परंतु दुबार मतदारांमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
----------------------------------------------
५८८ संशयित मतदार
पनवेल विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीदरम्यान सहा लाख ५२ हजार मतदार होते. नव्या नोंदणीमध्ये २३ हजार मतदारांची वाढ झाली आहे. त्यापैकी २,८०० नावे असल्याने दुबार मतदारांची संख्या २८,६५५ वर गेली आहे. पनवेल मतदारसंघात ५८८ संशयित मतदारांची नोंद असून, कन्नड भाषेतील किंवा संशयास्पद पत्त्यांची माहिती देण्यात आली आहे.
------------------------------
मतदारसंघ दुबार नावे
उरण - २७,२७५
ऐरोली - १६,०९६
बेलापूर - १५,३९७
-----------------------------
पनवेल मतदारसंघात दुबार मतदारांची समस्या सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आता नव्या मतदार याद्यांमध्ये २,८०० मतदारांची नावे दुबार आहेत. पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मतदारांना न्याय मिळावा, हीच आमची भूमिका असून, याविरोधात जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारू.
- बाळाराम पाटील, माजी आमदार