विराट कोहलीच्या एका साध्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवली.
'तुम्ही तेव्हाच खरोखर अपयशी होता, जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता' या वाक्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण केले होते.
त्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याने ती काय केली होती, हे काही तासातच स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी (१६ ऑक्टोबर) भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सकाळीच चर्चेचा विषय ठरला होता. त्याने सकाळी १० वाजता केलेल्या पोस्टची सर्वत्र चर्चा होती. विराट आता सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो.
बऱ्याचदा केवळ जाहिरातींचेच पोस्ट करत असतो. पण गुरुवारी सकाळी त्याने केवळ एका वाक्याची पोस्ट टाकल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. त्याने ही पोस्ट का केली असावी अशी चर्चा होती. पण आता अखेर खरं कारण समोर आलं आहे.
Virat Kohli Property : विराटने भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी, आलिशान बंगला ते लक्झरी फ्लॅट... जाणून घ्या काय काय दिले; लंडनला होतोय शिफ्ट?विराटने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की 'तुम्ही तेव्हाच खरोखर अपयशी होता, जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता.' त्याच्या या पोस्टला काही तासातच लाखांत व्ह्युज आले होते.
त्याने या पोस्टमधून भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा वैगरे साधला आहे का, अशीही चर्चा झाली. मात्र ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी त्याच्याच संदर्भात विराटने एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यातून स्पष्ट झाले की त्याने ही पोस्ट एका जाहिरातीसंदर्भात केली होती. विराटने 'Wrogn' या ब्रँडच्या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्याने अपयशावर भाष्य केले आहे.
विराटने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की 'विजय तुम्हाला जे शिकवत नाही, ते अपयश शिकवते.'
तसेच तो व्हिडिओमध्ये म्हणाला, 'तुम्ही अपयशी ठरला, एकदा नाही, दोनदा नाही, सातत्याने. अपयश हा एक धडा आहे, तुमचं ट्रेनिंग आहे. ही आगच महानतेकडे नेते. तुम्ही आदर्श मानत असलेला प्रत्येक चॅम्पियन तुम्ही मोजूही शकत नाही, इतक्यावेळा अपयशी झालेला असतो. पण फरक काय? तर ते अपयशानंतर पुन्हा उठतात.'
'अपयश तुम्ही कोण आहात हे ठरवू शकत नाही, पण त्यावर दिलेली प्रतिक्रिया ते दाखवून देते. तुम्ही तिथेच पडून राहाणार की पुन्हा उभे राहणार? तुमची निराशा तुम्हाला तोडेल की तुम्हाला आणखी मजबूत बनवणार?'
Virat Kohli: विराट हार मानणाऱ्यातला नाही, २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार! दिनेश कार्तिक म्हणतो, तो असेल तर टेंशन नसेल...तो पुढे म्हणाला, 'त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही पडाल, तेव्हा स्वत: ची दया करण्यात एकही क्षण वाया घालवू नका. उठा, धुळ झटका आणि तुम्हाला काय बनायचे आहे, याची स्वत:ला आठवण करून द्या. पराभव पत्करण्यात नकार देणारे बना. कारण 'तुम्ही तेव्हाच खरोखर अपयशी होता, जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता.'
दरम्यान, विराट भारतीय संघासोबत बुधवारीच ऑस्ट्रेलियाला गेला आहे. भारतीय संघाला १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी विराटही भारतीय संघाचा भाग आहे.
दरम्यान, या मालिकेपूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून शुभमन गिलला भारताच्या वनडे संघाचा कर्णधार करण्यात आला आहे. त्यामुळे विराट आणि रोहित आता शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहेत.
तसेच सध्या या दोघांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्यावरही चर्चा होत आहे. ते २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत खेळणार आहेत की नाही, हे पाहावे लागणार आहे.