Tata Motors demerger : नवीन शेअर TMLCV ची लिस्टिंगची तारीख, शेअरची किंमत असेल आणि पुढील प्रक्रिया काय?
ET Marathi October 15, 2025 08:45 PM
शेअर बाजार गुंतवणुकदारांमध्ये मोठ्या चर्चेत असलेला विषय म्हणजेच टाटा मोटर्सचे डीर्मर्जर होय. कंपनीने आपला व्यवसाय विभाजित केला आहे. या बहुचर्चित डीमर्जरनंतर आता गुंतवणूकदारांचे लक्ष कंपनीच्या व्यावसायिक वाहन युनिटच्या स्वतंत्र लिस्टिंगकडे लागले आहे. या ट्रक आणि बस व्यवसायाचे अंदाजित बाजार मूल्य प्रति शेअर 260.75 रुपये आहे. टाटा मोटर्सच्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहन (PV आणि CV) व्यवसायाच्या विभाजनाची 'रेकॉर्ड डेट' 14 ऑक्टोबर होती. याचा अर्थ, या तारखेपर्यंत ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स होते, त्यांना आता प्रत्येक शेअरमागे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड (TMLCV) चा एक शेअर मिळेल. नियामक मंजुरी मिळाल्यावर साधारणपणे 30 ते 45 दिवसांच्या आत हे शेअर्स भागधारकांच्या खात्यात जमा होतील आणि त्यानंतर TMLCV शेअर बाजारात (एनएसई आणि बीएसईवर) स्वतंत्रपणे सूचीबद्ध होईल.



या व्यावसायिक वाहन (CV) विभागाचे 260.75 रुपये प्रति शेअर हे अंदाजित मूल्य, डीमर्जरपूर्वीच्या टाटा मोटर्सच्या 660.75 रुपये प्रति शेअर क्लोजिंग प्राइस आणि सध्याच्या टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड (TMPV) च्या 400 रुपये प्रति शेअर ओपनिंग प्राइसच्या फरकावरून काढण्यात आले आहे.



ब्रोकरेज कंपन्यांच्या मते, या डीमर्जरमुळे टाटा मोटर्सच्या विविध व्यवसायांचे मूल्यांकन अधिक स्पष्ट होईल आणि 'मूल्य निर्मिती' होईल. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे पंकज पांडे यांनी सांगितले की, "आम्ही सीव्ही व्यवसायासाठी आर्थिक वर्ष 2027 च्या आधारावर 11 पट EV/EBITDA गृहीत धरत आहोत, ज्यामुळे अंदाजित मूल्य 300 रुपये येते. कारण स्पर्धक कंपन्यांनाही असेच मल्टीपल्स मिळत आहेत." ते पुढे म्हणाले की, "PV विभागाची किंमत 450 ते 500 रुपये दरम्यान राहण्याचा आमचा अंदाज योग्य वाटतो. हे विभाजन अपेक्षित असल्याने तसेच दोन्ही व्यवसायांना वेगवेगळ्या वाढीच्या संधी मिळत असल्याने, काही प्रमाणात मूल्य निर्मिती नक्कीच होईल."



नोमुरा या ब्रोकरेज फर्मने पीव्ही (367 रुपये) आणि सीव्ही (365 रुपये) युनिट्सचे मूल्य जवळपास समान ठेवले आहे. मात्र, 'एक्स-डीमर्जर' व्यवहारामुळे आणि इंडेक्स वेट ॲडजस्टमेंट्समुळे नजीकच्या काळात 'तांत्रिक धोका' (टेक्निकल रिस्क) आणि बाजारात अस्थिरता राहू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



अ‍ॅम्बिट इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते, "सीव्ही व्यवसाय डीमर्जरचा फायदा घेण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत आहे," कारण त्याचे मजबूत बाजार नेतृत्व, उद्योगाशी जुळणारे मार्जिन आणि स्थिर रोख निर्मिती आहे. अ‍ॅम्बिटला "सीव्हीसाठी त्वरित मूल्य अनलॉक होण्याची" अपेक्षा आहे आणि उर्वरित सूचीबद्ध कंपनीची किंमत सुमारे 380 रुपये प्रति शेअर राहील असा त्यांचा अंदाज आहे.



एसबीआय सिक्युरिटीजने डीमर्जरनंतर TMPV ची किंमत 285–384 रुपयांदरम्यान आणि TMLCV साठी 320–470 रुपयांदरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.



भारतातील सर्वात मोठा व्यावसायिक वाहन उत्पादक म्हणून टाटा मोटर्सकडे पाहिले जाते. आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये त्यांचा मार्केट शेअर 37.1% होता.



गुंतवणूकदारांना सीव्ही शेअर बाजारात येण्याची (नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला अपेक्षित) वाट पाहावी लागेल. तोपर्यंत, 260 रुपये प्रति शेअरचे मूल्य केवळ एक अंदाज आहे. तज्ज्ञांना नजीकच्या काळात अस्थिरता अपेक्षित आहे, परंतु दीर्घकालीन प्रगतीबद्दल ते आशावादी आहेत.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.