INDW vs AUSW: चुकीला माफी नाही! भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलंच, पण ICC नेही सुनावली शिक्षा
esakal October 15, 2025 08:45 PM
  • महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय संघाची कामगिरी संमिश्र राहिली आहे.

  • रविवारी ऑस्ट्रेलियाकडून भारताला या स्पर्धेतील दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

  • या सामन्यानंतर आता आयसीसीने भारतीय संघावर दंडात्मक कारवाई केली आहे.

महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी संमिश्र झाली आहे. पहिल्या दोन सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान संघाला पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियन संघाकडून मात्र भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

विशाखापट्टणमला रविवारी (१२ ऑक्टोबर) झालेल्या रोमांचक सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाने ३ विकेट्स आणि ६ चेंडू राखून पराभूत केले. या पराभवामुळे भारताची चिंता आधीच वाढली आहे. अशात आता भारतीय संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) कारवाई झाली आहे.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

या सामन्यात भारतीय संघाकडून षटकांची कमी राखण्याची चूक झाली, ज्यामुळे आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. या सामन्यात निर्धारित वेळेपेक्षा भारतीय संघाने एक षटक उशीरा टाकले. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाला सामना शुल्काच्या ५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

ही शिक्षा सामनाधिकारी मिशेल परेर यांनी मंजूर केली आहे. भारतीय संघावर एक षटक उशिरा टाकण्याचा आरोप मैदानावरील पंच स्यु रेडफर्न आणि निमाली परेरा, तिसरे पंत किम कॉटन आणि चौथे पंच जॅकलिन विल्यम्स यांनी केले होते.

आयसीसीच्या आचारसंहितेनुसार कलम २.२२ नुसार निर्धारित वेळेपेक्षा एका उशिरा टाकलेल्या षटकासाठी खेळाडूंना सामना शुल्काच्या ५ टक्के दंड आकारण्यात येतो. या नियमानुसार भारताकडून गोलंदाजीवेळी एक षटक टाकण्यास निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाल्याने ५ टक्के दंड झाला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने चूक मान्य केल्याने याबाबत कोणतीही सुनावणी होणार नाही.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने स्मृती मानधना (८०) आणि प्रतिका रावल (७५) यांच्या खेळींच्या जोरावर वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च ३३० धावसंख्या उभारली आणि ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे लक्ष्य ठेवले.

मात्र ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य ७ विकेट्स गमावत ४९ षटकातच पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एलिसा हेलीने १४२ धावांची मोठी खेळी केली. तसेच फोबी लिचफिल्ड (४०), एलिस पेरी (४७*) आणि ऍश्ले गार्डनर (४५) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने महिला वनडे इतिहासातील यशस्वीपणे सर्वोच्च लक्ष्य पार करण्याचा विश्वविक्रम केला.

IND vs AUS: विराट-रोहितला खेळताना पाहण्याची ऑस्ट्रेलियन्सला शेवटची संधी, पॅट कमिन्सने बोलूनच दाखवलं

भारतीय संघ सध्या गुणतालिकेत ४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आता भारताला रविवारी (१९ ऑक्टोबर) इंग्लंडविरुद्ध इंदोरला सामना खेळायचा आहे. ऑस्ट्रेलिया अद्याप अपराजित असून ते ७ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलिया पाचवा सामना गुरुवारी (१६ ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.