काही वर्षांपूर्वी राजकारणात विचारधारा, वैचारिक निष्ठा यांना महत्व होत. पण अलीकडे या गोष्टींना फारस महत्व राहिलेलं नाही. आपल्या आसपासच्या राजकारणावर नजर टाकली, तर विचार दुय्यम झाल्याच दिसून येईल. राजकीय महत्वकांक्षा, अपूर्ण इच्छा यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते सहज एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. मागच्या तीन-चार वर्षात पक्ष बदलाचं हे प्रमाण जास्तच वाढलं आहे. मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून तर पक्ष बदल सर्रास दिसून येत आहे. यात महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाला सर्वात जास्त फटका बसला आहे. दोन्ही पक्षांतून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते फुटून बाहेर पडले.
आता पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे एकापक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचं प्रमाण वाढेल. महत्वाच म्हणजे जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रवेश देऊन आपला पक्ष बळकट करण्याची ही स्पर्धा महायुतीमध्ये जास्त दिसून येते. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेमध्ये आहेत. मात्र यवतमाळ वणीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला. भाजपचे नेते विजय चोरडीया ऍड कुणाल चोरडीया यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप बॅकफूटवर जाणार आहे. संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजय चोराडीया आणि कुणाल चोराडीया यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
भाजप शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत
तर, दुसऱ्याबाजूल सोलापूर माढा येथे भाजप शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवाजीराव सावंतानी राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला होता. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले शिवाजीराव सावंताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भेटीसाठी निरोप आला आहे. आज अकलुजच्या श्रीपूरमध्ये दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी शिवाजीराव सावंत यांची बैठक होणार आहे. त्यात सावंतांच्या भाजप पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे. शिवाजीराव सावंत शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सख्खे भाऊ आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरला येणार आहेत.