शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन हा शब्द ऐकताच अनेकांना भीती वाटते. पण त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर सांगतात ते प्रत्येक नियम काटेकोरपणे पाळणं. डॉक्टर नेहमी सांगतात की, ऑपरेशनपूर्वी काही तास उपाशी राहावं. अनेकजण विचारतात, “थोडं दूध किंवा हलका नाश्ता चालेल ना?” पण खरं सांगायचं तर, असं केल्याने धोका निर्माण होऊ शकतो. मग हा उपवासाचा सल्ला एवढा महत्त्वाचा का असतो? (operation before fasting reason scientific explanation)
शस्त्रक्रियेपूर्वी उपाशी राहण्यामागचं कारण
शस्त्रक्रियेनंतर भूल देण्यात येते, आणि या वेळी शरीराचे नैसर्गिक रिफ्लेक्स म्हणजे गिळणे, खोकणे किंवा अन्न परत वर येणे हे तात्पुरते थांबतात. जर या वेळी पोटात अन्न किंवा पाणी असेल, तर ते उलटं येऊन फुफ्फुसात जाऊ शकतं. त्यामुळे ‘एस्पिरेशन न्यूमोनिया’सारखा आजार होऊ शकतो, ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते. म्हणूनच डॉक्टर ऑपरेशनपूर्वी कमीतकमी 8 ते 12 तास अन्न न घेण्याचा सल्ला देतात.
उपवास म्हणजे सुरक्षित शस्त्रक्रिया
उपवास केल्याने पोट रिकामं राहतं. त्यामुळे भूलतज्ज्ञांना भूल देताना अधिक सुरक्षितता राखता येते. शिवाय शस्त्रक्रियेनंतर मळमळ, उलट्या किंवा पोटदुखी यांचा त्रास कमी होतो. काही वेळा पाण्यासारखे स्वच्छ द्रव पदार्थ दोन तास आधीपर्यंत घेण्यास परवानगी असते, पण तेही फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार.
सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी लागू
मोठी असो वा लहान शस्त्रक्रिया भूल देण्याची प्रक्रिया सारखीच असते. भूल दिल्यानंतर शरीराची प्रतिक्रिया कमी होते, त्यामुळे प्रत्येक शस्त्रक्रियेत पोट रिकामं असणं आवश्यक असतं. काही प्रकरणांमध्ये उपवासाचा कालावधी कमी असतो, परंतु हा कालावधी डॉक्टर ठरवतात.
पालन केल्याने होणारे फायदे
जर तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेपर्यंत उपाशी राहिलात, तर शस्त्रक्रियेच्या वेळी श्वसनमार्ग सुरक्षित राहतात, अडचणी कमी होतात आणि प्रक्रियेनंतर लवकर बरे होण्यास मदत मिळते. नियम मोडल्यास ऑपरेशनदरम्यान गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
या गोष्टी लक्षात ठेवा
ऑपरेशनपूर्वी उपवास हा फक्त एक वैद्यकीय नियम नाही, तर तो सुरक्षिततेची हमी आहे. थोडं खाल्लं तरी चालेल’ असं समजणं चुकीचं ठरू शकतं. औषधे पाण्यासोबत घेणं आवश्यक असतं, पण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करा. चुकून काही खाल्लं किंवा प्यायलं असल्यास डॉक्टरांना लगेच कळवा. लपवू नका कारण त्यातून धोका वाढू शकतो.