चांदी इतकी का महागली? लोक जास्त पैसे द्यायला तयार असूनही चांदी का मिळत नाहीये?
BBC Marathi October 16, 2025 08:45 PM
Getty Images

जर तुम्हाला असं कुणी सांगितलं की, तुम्ही वापरत असलेलं AI, 5G इंटरनेट आणि इलेक्ट्रिक गाडी यांच्यामुळे चांदी महागली आहे तर?

गोंधळलात ना? पण हे खरंय.

सोन्याचे दर सव्वा लाखांच्या वर गेले आहेत, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण गेल्या काही दिवसांत चांदीचे दर किती वर गेलेले आहेत, ते पाहिलंत का?

चांदीसाठीची जगभरातील मागणी वाढल्याने गेल्या वर्षभरात चांदीच्या दरांनी जवळपास 75 टक्क्यांनी उसळी घेतलेली आहे.

चांदीचे दर किलोमागे दीड लाखांपर्यंत गेले आहेत.

चांदी इतकी का महागली आहे? भारतातल्या मार्केट्समध्ये चांदीचा तुटवडा का निर्माण झाला आहे?

आणि भारतातल्या ETFs नी नवीन सबस्क्रिप्शन्स घेणं का बंद केलं आहे? समजून घेऊया...

चांदीला इतकी मागणी का आहे?

सगळ्यात आधी चांदीला इतकी मागणी का आहे, ते पाहूयात. चांदीला इतकी मागणी आहे, कारण चांदी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर फक्त दागिने वा चांदीची भांडी येत असली तरी जगभरातल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसाठी चांदी महत्त्वाची आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहनं, हायब्रिड गाड्या, औषध उद्योग, सोलर पॅनल्स, AI चं हार्डवेअर, 5G इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांमध्ये चांदीचा वापर होतो आणि यात चांदीला कोणताही पर्याय उपलब्ध नाहीये.

चांदीला जगभरातून असणाऱ्या मागणीपैकी 50 टक्के चांदी ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीजकडून येते. परिणामी चांदीचं मोल आणि मागणी या दोन्हींत वाढ झाली आहे. पण उत्पादन मात्र वाढलेलं नाही.

Getty Images 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत चांदीच्या किमती 61 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

गेली चार वर्षं चांदीला असणारी मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. कारण, जगामध्ये आता उत्पादन होत असलेल्या एकूण चांदीपैकी 70 टक्के चांदीचं उत्पादन हे 'बायप्रोडक्ट' म्हणून होतं. म्हणजे दुसऱ्या एखाद्या धातूचं उत्खनन करताना चांदीही मिळते. अधिकतर चांदी अशीच प्राप्त होते. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यातली तफावत वेगाने वाढते आहे.

शिवाय, गुंतवणूक म्हणून चांदीला महत्त्व आल्याने प्रत्यक्ष चांदीची नाणी वा बार विकत घेणं, तसेच, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स विकत घेणं यांचंही प्रमाण वाढलंय.

याशिवाय, सप्टेंबर महिन्यात अमेरिकेने चांदीचा समावेश Critical Minerals List च्या मसुद्यात केल्यानंतर अमेरिकेला पाठवण्यात येणारं चांदीचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याचे पडसादही मार्केटमध्ये उमटले आहेत.

भारतात चांदीचा तुटवडा का निर्माण झालाय?

दिवाळीच्या या सणासुदीच्या काळात भारतीय सराफ बाजारांमध्ये चांदीची प्रचंड कमतरता निर्माण झालेली आहे.

चांदीचे दर गगनाला भिडलेले असूनही लोक चांदीची खरेदी करायला तयार आहेत, मात्र दुकानदारांकडे चांदी उपलब्ध नाहीये.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी चांदी 1,78,100 रुपये प्रति किलो या दराने विकली जात होती.

खरं तर, या विक्रमी किमतीच चांदीच्या कमतरतेमागचं कारण आहेत.

ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे (एआयजेजीएफ) नॅशनल सेक्रेटरी आणि दिल्लीतील मेहता ज्वेलर्सचे मालक बिमल मेहता यांनी सांगितलं की, "मार्केटमध्ये अचानकच चांदीला मागणी आली आहे. चांदीची नाणी आणि बार यांना मागणी वाढलेली आहे. लोक पैसे घेऊन फिरत आहेत पण त्यांना चांदी मिळत नाहीये, अशी परिस्थिती आहे."

पुढे त्यांनी सांगितलं की, सध्या लोक चार-पाच हजार रुपये जास्तीचे द्यायला तयार आहेत; मात्र चांदी उपलब्ध नाहीये.

Getty Images चांदीचे दागिने हा एकमेव पर्याय नाही, भांडी आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू देखील चांदीपासून बनवल्या जातात.

मार्केटमध्ये सध्या चांदी 30 हजार रुपये प्रिमियम दराने विकली जात आहे. तरीही ग्राहक ती घ्यायला तयार आहेत. मात्र, मार्केटमध्ये पुरेशी चांदीच उपलब्ध नाहीये.

30 हजार रुपयांचा प्रीमियम म्हणजे लोक चांदी खरेदी करण्यासाठी 30 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे देण्यास तयार आहेत.

पण मग भारतात चांदीचा तुटवडा का निर्माण झालाय?

तर भारत हा चांदीचा जगातला सर्वात मोठा ग्राहक आहे. आणि भारताच्या चांदीच्या एकूण मागणीपैकी 80% चांदी आयात केली जाते.

2025 च्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये 3,302 टन चांदी आयात केली. या काळात सिल्व्हर ETF ची मागणी वाढली. सप्टेंबर महिन्यात सिल्व्हर ETF मध्ये 53.42 अब्ज रुपये गुंतवले गेले.

नियमांनुसार एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या एका युनिटमागे 1 ग्रॅम चांदी प्रत्यक्ष बाजूला ठेवली जाते.

म्हणजे,

1 युनिट ETF = 1 ग्रॅम चांदी

बँका किंवा बुलियन ट्रेडर्सकडून ही चांदी विकत घेतली जाते.

जगाच्या तुलनेत भारतात चांदी का महाग?

आता चांदीचा तुटवडा निर्माण झाल्याने भारतात चांदीच्या किंमतीवर जगभराच्या किंमतीपेक्षा साधारण 10 टक्के अधिक प्रिमियम आकारला जातोय.

म्हणजे जगाच्या तुलनेत भारतातील किंमत जास्त आहे.

खरंतर याचा फायदा घेण्यासाठी चांदीची आयात बँका वाढवू शकल्या असत्या. पण मुळात चांदीचं उत्पादन करणाऱ्या प्रमुख देशांकडेच चांदीचे मर्यादित साठे आहेत.

Getty Images आता चांदीचा तुटवडा निर्माण झाल्याने भारतात चांदीच्या किंमतीवर जगभराच्या किंमतीपेक्षा साधारण 10 टक्के अधिक प्रिमियम आकारला जातोय.

मेक्सिको, चीन, पेरू, चिली, बोलिव्हिया, पोलंड, ऑस्ट्रेलिया, सर्बिया हे देश चांदीचे प्रमुख उत्पादक आहेत. त्यात चांदीसाठीची इंडस्ट्रियल मागणी - वाहतुकीतल्या अडचणींमुळे आयातीचं प्रमाण वाढलेलं नाही.

चांदीवरच्या या प्रिमियममुळे ETF च्या नवीन सबस्क्रायबरसाठीचा भाव वाढत होता. आणि गुंतवणूकदारांना हे फुगलेले भाव द्यावे लागू नयेत, म्हणून ETFs नी नवीन सबस्क्रिप्शन तात्पुरतं बंद केलंय.

दिवाळी - लग्नसराईचे दिवस पाहता भारतातली प्रत्यक्ष चांदीसाठीची मागणी चढीच राहील आणि चांदीचे दरही चढेच राहतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

याआधी कधी असा तुटवडा निर्माण झालाय का?

चांदीला यापूर्वी अशी प्रचंड मागणी तयार झाली होती का? या प्रश्नावर बिमल मेहता यांनी म्हटलं की, "माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मी चांदीला इतकी मोठी मागणी पाहिली आहे. गेल्या वर्षी चांदी सरासरी 75 हजार रुपये प्रति किलो या किमतीत उपलब्ध होती. एका वर्षातच ती 2 लाख रुपयांवर पोहोचली आहे. कुणीही अशी अपेक्षा नव्हती."

पुढे ते सांगतात की, "पंजाबपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांना चांदी हवी असते. आम्ही बाहेरून (परदेशातून) चांदी खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण तिथेही तुटवडा आहे. सध्या सर्वत्र चांदीची मागणी आहे."

Getty Images चांदीचे दर लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) द्वारे निश्चित केले जातात.

खरं तर, गुंतवणूकदार सणासुदीच्या हंगामातील खरेदी आणि गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य देत असत. मात्र, अलीकडे सोन्याच्या दरात झालेल्या वाढीनंतर, सोनं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे.

आयबीजेएनुसार, 14 ऑक्टोबर रोजी 99.9 टक्के शुद्धतेसह 10 ग्रॅम सोने 1,26,152 रुपयांना विकले जात होते.

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना या वर्षीही लक्षणीय परतावा मिळालेला नाही. या वातावरणात, चांदीच्या किमतीत अचानक झालेली वाढ गुंतवणूकदारांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास आलेली आहे.

2025 च्या सुरुवातीच्या 9 महिन्यांमध्ये, चांदीमध्ये 61 टक्क्यांनी तेजी आलेली आहे.

गुंतवणुकीसाठी चांदीला पसंती

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, जानेवारी 2025 मध्ये एक औंस चांदीची किंमत 28.92 डॉलर होती, जी सप्टेंबरच्या अखेरीस 46 डॉलरवर पोहोचली.

त्यामुळे, गुंतवणुकीच्या उद्देशानं चांदीची मागणी सध्या वाढली आहे. सध्या तरी चांदीचे दर जास्त राहतील असा तज्ज्ञांचा दावा आहे.

Getty Images 2025 मध्ये चांदीच्या आयातीत घट झाली.

एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेडच्या कमोडिटी रिसर्च प्रमुख वंदना भारती सांगतात की, "दागिने, भांडी, नाणी यासारख्या गोष्टींव्यतिरिक्त, चांदीचा वापर आता अनेक औद्योगिक वस्तूंमध्येही केला जात आहे.

एआयपासून सोलर, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्समध्येही चांदीचा भरपूर वापर होतो आहे. त्यामुळेच, चांदीची मागणी पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे."

एआयजेजीएफचे राष्ट्रीय महासचिव आणि केडिया फिनकॉर्पचे संस्थापक नितीन केडिया म्हणाले की, "व्यावसायिक गरजांव्यतिरिक्त, जगभरातील रिझर्व्ह बँका त्यांच्या साठ्यातील सोने आणि चांदी अधिक प्रमाणात वाढवत आहेत."

टॅरिफ वॉर आणि भू-राजकीय तणाव यामुळेही सुरक्षित संपत्ती म्हणून चांदीची मागणी वाढत आहे. हे सर्व घटक चांदीच्या किमतींमध्ये सतत वाढ होण्यास हातभार लावत आहेत.

चांदीची आयात का वाढवू शकले नाहीत ज्वेलर्स?

चांदीची आयात वाढवता येईल का? या प्रश्नावर वंदना म्हणाल्या की, 2020-21 पासून, मागणीनुसार चांदीचं उत्पादन वाढलेलं नाहीये. याचा अर्थ पुरवठा आधीपासूनच मर्यादित आहे.

आता, बाजारात आधीच उपलब्ध असलेली जी चांदी आहे, तिची खरेदी आणि विक्री सध्या सुरू आहे. या चांदीच्या किमती लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) द्वारे निश्चित केल्या जातात.

Getty Images सोने आणि चांदीचे दर दररोज विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत.

मागणी वाढल्याने, LBMA व्यापाऱ्यांकडून खूप जास्त प्रीमियमची मागणी केली जात आहे. उदाहरणार्थ, जर एक किलो चांदीची किंमत 8 लाख रुपये असेल, तर त्यांना 12 लाखांची मागणी केली जात आहे.

इतक्या जास्त किमतीत आयात केल्यानंतर, आलेली चांदी पूर्णपणे विकली जाईल याची कोणतीही हमी नाहीये.

त्यामुळे, मोठं नुकसान होण्याच्या भीतीनं ते ही आयात टाळत आहेत.

चांदी स्वस्त होण्याची शक्यता कमी

चांदीच्या किमती यापूर्वीही विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत आणि नंतर या किमती त्या पातळींवरून झपाट्याने खाली आल्या आहेत.

यावेळीही असंच काही घडू शकतं का? वंदना म्हणतात की, याची शक्यता कमी आहे.

"1980 मध्ये पहिल्यांदा चांदीच्या किमतींनी 50 डॉलर प्रति औंसची मर्यादा ओलांडली."

Getty Images 1980 मध्ये पहिल्यांदाच चांदीने प्रति औंस 50 डॉलर्सचा टप्पा ओलांडला.

"त्यानंतर, त्या 90 टक्क्यांनी घसरल्या. त्यानंतर, 2011 मध्ये, चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या, ज्यामध्ये नंतर 70 टक्क्यांनी घट झाली."

"2025 मध्ये चांदीच्या किमती 80 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मागील ट्रेंड पाहता, गुंतवणूकदारांना अशीही चिंता आहे की, यामध्ये घसरण होऊ शकते, परंतु असं होणार नाही."

"यावेळी चांदीच्या किमती वाढण्यामागे काही ठोस कारणं आहेत, त्यामुळे किमतीत लक्षणीय घट होण्याची शक्यता खूपच कमी आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • बँकिंग क्षेत्रात नोकरी करायचीय? परीक्षा कधी आणि कशी असते? जाणून घ्या सर्वकाही
  • सोनं सव्वा लाखांच्या पार, आगामी काळात सोन्याची किंमत वाढतच जाईल की कमी होईल?
  • सोन्याच्या किंमती का वाढत आहेत? ही वेळ सोनं खरेदी करण्यासाठी योग्य आहे का?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.