Petrol Bottle Sale Ban : बाटलीतील पेट्रोलला खरंच बंदी आहे का? पंपांवर बंदीचे लावलेले फलक काय कामाचे?
esakal October 17, 2025 06:45 AM

Petrol Bottle Ban : अत्यंत ज्वलनशील असणारं पेट्रोल बाटलीतून देण्यास बंदी आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही बंदी आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसून येत नाही. ‘सकाळ’ने केलेल्या ‘फॅक्ट चेक’मध्ये (Sakal Fact Check) बाटलीतून सर्रास पेट्रोल दिले जात असल्याचे निदर्शनास आले. मग, पंपांवर बंदीचे लावलेले फलक काय कामाचे?

सांगलीत काही वर्षांपूर्वी शहरातील एका घरात पेट्रोलचा स्फोट झाला. त्यात अख्खं कुटुंब ठार झालं. अत्यंत दुर्दैवी घटनेने साऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले. त्यानंतर बाटलीबंद पेट्रोल विक्रीवर जोरदार चर्चा झाली. बाटलीतून पेट्रोलविक्रीला बंदीच आहे. आंदोलनांसह अन्य ठिकाणी याचा गैरवापर होऊ नये, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी याला बंदी घातली आहे. शासनाने हा नियम विचारपूर्वक केला आहे. मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसून येत नाही.

Delhi High Court lawyer Video Viral : ऑनलाईन कोर्टात वकिलाचा 'रोमान्स' कॅमेऱ्यात कैद; हायकोर्टातील धक्कादायक प्रकार तुफान व्हायरल

‘सकाळ’च्या टीमने शहरातील काही पेट्रोल पंपांवर खात्री केली. त्यात ९० टक्के पंपांवर पेट्रोलची बाटलीतून सर्रास दिले जात असल्याचे निदर्शनास आले. शहरातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर एकजण दुचाकीवरून मोकळी बाटली घेऊन आला. त्याने शंभर रुपयांचे पेट्रोल बाटलीतून घेतले. त्याच्या समोरील बाजूस ‘बाटलीत पेट्रोल मिळणार नाही,’ असा फलक दिसून आला. प्रत्येक पंपांवर हा फलक दिसून येतो. मात्र नियम धाब्यावर बसवले जातात. काही पंपांवर गाडी बंद पडली असावी, या भावनेतून पेट्रोल दिले जात असल्याचे दिसून आले.

सांगलीतील संवेदनशील भागातील पंपांवरही सर्रास विक्री होत असल्याचे दिसून आले. आंदोलनांसह गुन्हेगारीसाठी पेट्रोलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु नियम हा मोडण्यासाठीच केला जातो, ही भावना काही पंपचालकांची आहे. यावर नियंत्रण जिल्हा पुरवठा शाखेकडून केले जाते. त्या विभागाची ‘आधीच उल्हास...’ अशी गत आहे. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनीच पंपचालकांना सूचना देण्याची आवश्यकता आहे.

पोलिस पंपावर नियमांचे पालन

सांगली पोलिस दलाच्या पंपावर बाटलीतून पेट्रोलची मागणी करण्यात आली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्याने बाटलीतून पेट्रोल देण्यास बंदी असल्याचे स्पष्ट सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.