सार्थक म्हामूणकरचा अचूक वेध
तिरंदाजीत राज्य स्पर्धेसाठी निवड
माणगाव (वार्ताहर) ः येथील माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गणेश यशवंत वाघरे इंग्रजी शाळेतील सातवीतील विद्यार्थी सार्थक म्हामूणकर याने विभागीय स्तरावरील तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. त्याच्या अचूक लक्ष्यभेदामुळे सार्थकची तिरंदाजी स्पर्धेत राज्य स्तरावर निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सार्थक म्हामूणकर याने कल्याण येथील बी. के. बिर्ला कॉलेजमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कोकण विभागीय स्तरावरील तिरंदाजी स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवून रौप्य पदक पटकावले. त्यामुळे सार्थक म्हामूणकर याची निवड २९ ते ३१ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यापूर्वीदेखील सार्थकने विभागीय स्तरावरील तिरंदाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. आपल्या देशासाठी खेळण्याची आणि ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करण्याची सार्थकची मनोमन इच्छा आहे. सध्या सार्थक हा येथील एकलव्य अकॅडमीत बाळू ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. या कामगिरीबद्दल सार्थकचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सचिव कृष्णा गांधी, स्कूल कमिटी चेअरमन नरेंद्र गायकवाड, नितीन बामगुडे, चेअरमन अरुण पवार, मुख्याध्यापिका मनीषा मोरे आणि शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.