इतिहासाची साक्ष देणारा किल्ला बनविण्यात चिमुकले मग्न
अलिबाग, ता. १६ (वार्ताहर) ः दिवाळी म्हटलं की, किल्ला बनविणे आलेच. मुलांच्या परीक्षा संपल्याने किल्ला बनविण्यात चिमुकले मग्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठीचा संदेशच जणू ही चिमुकले दिवाळीत किल्ले बनवून देत आहेत. किल्ला बनविल्यानंतर त्यावर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळेही हवेतच. सध्या अलिबागमध्ये विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या मातीच्या प्रतिकृती विक्रीसाठी दाखल झाल्या असून, त्या घेण्यासाठी बच्चेकंपनी गर्दी करीत आहे.
आपल्या महाराष्ट्रात गड-किल्ल्यांना एक आगळे-वेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी व मराठी मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. लहान मुलांमध्ये किल्ले व इतिहासाविषयी माहिती व्हावी या हेतूने दिवाळीत जिल्ह्यात मातीचे किल्ले बनविण्याच्या स्पर्धाही विविध सामाजिक मंडळे, राजकीय पक्षांकडून आयोजित केल्या जातात. किल्ले बांधणीची स्पर्धा होत असल्याने बाळगोपाळ किल्ल्यांचा अभ्यास करूनच ते साकारत आहेत. सध्या बाजारात रेडीमेड किल्लेही आले आहेत, मात्र रेडीमेड अथवा काल्पनिक किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याकडे चिमुकल्यांचा कल वाढू लागला आहे.
असा साकारतोय किल्ला
गावाकडे प्रामुख्याने दगड, माती, शेण अशा गोष्टी एकत्र करून एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली जाते. हा किल्ला तयार करताना मुलांवर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी सोपवली जाते. काही जण हे किल्ला बांधणी करतात, तर काही साहित्य आणण्याचे काम करतात. हिरवळीसाठी विविध प्रकारचे धान्यही पेरले जाते. पायऱ्या, बुरुज आणि प्रवेशद्वार बांधून किल्ला साकारण्यात चिमुकले शिलेदार दंग झालेले दिसतात. किल्ला बांधून झाल्यावर रंगरंगोटी करून त्याला मूर्त स्वरूप दिले जाते. शेवटी भगवा ध्वज आणि सिंहासनावर आरूढ असणारे छत्रपती शिवाजी महाराज विराजमान करून प्रवेशद्वारापासून भालदार, चोपदार, सनई चैघडेवाले, घोडेस्वार, सेनापती, मावळे दिमतीला हजर केले जातात. अगदी तनमनधन लावून एकचित्ताने बनविलेला किल्ला सर्वांना दाखविण्यासाठी चिमुकले आतुर झालेले असतात.