पिंपरी : क्रेन बाजूला घेण्याचा कारणावरून झालेल्या वादात टोळक्याने एकाला बेदम मारहाण करीत क्रेनची काच फोडून नुकसान केले. या प्रकरणी याकूब सय्यदखान (रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जावेद रेहमानी, जुनेद रेहमानी, अली रेहमानी, परवेझ रेहमानी, आलम रेहमानी, काशिम रेहमानी, अक्तर रेहमानी (सर्व रा. कुदळवाडी, चिखली) व इतर वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा क्रेन चालक रहमान खान व छोटा टेम्पोचालक ललावू रेहमानी यांच्यात क्रेन बाजूला घेण्यावरून वाद झाला. त्यामुळे टेम्पो चालकाने आरोपी जावेद यास बोलावून घेऊन क्रेनचालक रहमान खान याच्याशी वाद करीत असताना तेथे फिर्यादी यांचा मुलगा हैदर खान व इम्रान खान हे आले. ते वाद सोडवीत असताना त्यांना शिवीगाळ व हाताने मारहाण केली. त्यानंतर या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी दांडके, रॉड व कोयते घेऊन येत फिर्यादीला शिवीगाळ, धमकी देत मारहाण केली. तसेच क्रेनची काच फोडून नुकसान केले.
मोबाइल चोरीप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : तरुणाच्या हातातील मोबाइल चोरणाऱ्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. ही घटना भोसरीतील सहल केंद्राजवळ घडली. मयूर धर्मेंद्र सूर्यवंशी (रा. चऱ्होली फाटा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रेहान सोहराब अन्सारी तौसिफ (रा. गुळवे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने फिर्यादीच्या हातातील पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावला. पोलिसांनी त्याला अटक केली.
गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई जांबे येथे करण्यात आली. विशाल बाजीराव खाडे (रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५६० ग्रॅम गांजा, एक दुचाकी व एक मोबाइल असा एकूण ८८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
---