पिंपळवंडी, ता. १६ : ग्रामीण भागात जीवनवाहिनी असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा स्वतःच धोक्याची ठरत आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसची अवस्था ही अत्यंत बिकट झालेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत अशा धोकादायक गाड्या रस्त्यावर उतरवल्या जात आहेत.
ओतूर- नारायणगाव (ता. जुन्नर) मार्गावर धावणाऱ्या या बसच्या चालकाच्या बाजूचा दरवाजा, तसेच संरक्षक पत्रा तुटलेला असून, चालकाची सुरक्षाच यामुळे धोक्यात आली आहे. गाडी चालवताना विशेषतः वळणावर किंवा समोरून येणाऱ्या वाहनाच्या धोक्यापासून चालकाला कोणतेही संरक्षण मिळत नाही.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिक हे एसटी बसवर अवलंबून असतात. यात शाळकरी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. महामंडळाच्या अशा जीर्ण बस रस्त्यावर धावणार असतील तर भविष्यात मोठा अपघात झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न नागरिक आणि प्रवाशांना पडला आहे.
आगारात असलेल्या नादुरुस्त असलेल्या गाड्यांची तत्काळ तपासणी करावी व त्या त्वरित दुरुस्त कराव्यात, अशी मागणी नागरिक व प्रवासी करत आहेत.
02640