शिंदे गटाच्या बैठकीत स्वबळाची मागणी
esakal October 17, 2025 01:45 PM

शिंदे गटाच्या बैठकीत स्वबळाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदे सेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आणि पूर्वतयारीसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीमधील भाजपबाबत नाराजीचा सूर उमटला. ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या विकासकामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी व्यक्त केल्या. अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी बैठकीत केली. भाजप विरोधात नाराजीचा सूर लावला असून, पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी बैठकीत केली.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकांची तयारी दोन्ही प्रमुख पक्षांनी वेगात सुरू केली असतानाच महायुतीतील भाजप व शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून गुरुवारी (ता. १६) निवडणूक इच्छुकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरामुळे स्वबळाची चाचपणी सुरू झाल्याची चर्चा रंगत असतानाच, ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १५) माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीमधील भाजपबाबत नाराजीचा सूर उमटला. या बैठकीत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. विकासकामांमध्ये भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी अडथळे निर्माण करत असल्याच्या तक्रारी या वेळी करण्यात आल्या. त्यामुळे निवडणूक स्वबळावर लढवण्याचा सूर बैठकीतून उमटला. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत उपस्थित राहून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तसेच संघटना मजबूत ठेवण्याचे आवाहन केले.

स्थानिक पातळीवरील वाद चव्हाट्यावर
गेल्या काही महिन्यांपासून भाजप व शिंदे गटातील स्थानिक पातळीवरील वाद चव्हाट्यावर आले आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वारंवार टीका केली आहे. तर खासदार नरेश म्हस्के यांनी त्याला प्रत्युत्तर देत आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील महापालिका निवडणूक महायुतीऐवजी स्वतंत्रपणे लढवण्याच्या शक्यतेने जोर धरला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.