Gadhinglaj: गडहिंग्लज बाजारपेठ दिवाळीच्या झगमगाटात न्हाली; आकर्षक ऑफर्सने वाढवली खरेदीची लगबग
esakal October 17, 2025 01:45 PM

गडहिंग्लज: अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीनिमित्त येथील बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दुणावला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, वाहनांच्या चौकशीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. शिवाय, फराळाच्या साहित्यासह विविध आकर्षक रंगात आकाशकंदील, पणत्या, किल्ले उभारणीसाठी लागणारे सैनिक आदी साहित्याने बाजारपेठ गजबजून गेली आहे.

एकूणच दिवाळीच्या खरेदीसाठी आबालवृद्धांच्या गर्दीने व साहित्याने बाजारपेठ सजली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांकडून विविध वस्तूंची जोरात खरेदी असते. त्यात दुचाकी, चारचाकी वाहन, टीव्ही, फ्रीज, मोबाईल, सोने खरेदीचा उत्साह अधिक असतो. त्याची आतापासून चौकशी करून बुकिंग करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

Diwali Festival : दिवाळी खरेदीत पुणेकरांचा उत्साह; शनिवारी बाजारपेठा फुलल्या

जीएसटी दर कमी केल्याने खरेदीमध्ये वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शोरूम सजले आहेत. दुकानासमोर खास मंडप मारून ग्राहकांचे स्वागत होत आहे. विविध ऑफर्स सुरू केल्याने ग्राहकांचा प्रतिसादही चांगला असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. दिवाळीसाठी नवीन कपडे घेण्याची परंपरा असल्याने तयार कपड्यांसह सुटिंग-शर्टिंग दुकानातही ग्राहकांची रेलचेल सुरू झाली आहे. आकाशकंदील विविध प्रकारांत उपलब्ध झाले आहेत.

लक्ष्मी पूजेसाठी आवश्यक साहित्यासह रांगोळी, विविध आकारातील आकर्षक पणत्या बाजारात दाखल झाल्या आहेत. १०० ते ६०० रुपयांपर्यंत किमतीचे मोठे आकाशकंदील असून छोट्या आकाशकंदिलांनाही मागणी आहे. त्याचे दर डझनाला ३० ते २५० रुपयांपर्यंत आहेत. विविध रंगांची रांगोळी ३० रुपये किलोने विक्री सुरू आहे. पणत्यांचे दर ५० ते ७० रुपये डझन आहेत. दिवाळीनिमित्त घराघरांत रंगरंगोटीची कामेही उरकली जात आहेत. दिवाळीचा उत्साह हळूहळू दुणावत चालला आहे. शनिवारपासून दिवाळीला प्रारंभ होणार असल्याने घराघरांत फराळ बनवण्यासह लक्ष्मी पूजेची लगबग सुरू झाली आहे.

Diwali Festival : दिवाळी खरेदीचा जल्लोष! इलेक्ट्रॉनिक, वाहन, आणि दागिन्यांच्या बाजारपेठा तेजीत किल्ल्यांचे लागले वेध

दिवाळीची चाहूल लागल्यानंतर बालचमूंना विविध किल्ले उभारणीचे वेध लागतात.आजपासून शाळांना दिवाळीची सुटी पडली. त्यामुळे मुले आता किल्ले उभारणीत व्यस्त होतील. माती, दगडगोटे आणण्यापासून किल्ले उभारणीपर्यंत त्यांची धडपड असते. किल्ल्यांसाठी आवश्यक साहित्य सैनिक, झेंडे आताच बाजारात दाखल झाले आहेत. त्याच्या खरेदीसाठीही मुले पालकांना सोबत घेऊन बाजारपेठेत येत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.