चिखली, ता. १७ : अंगणवाडी मोरेवस्ती येथील अंगणवाडी रस्त्यालगत महापालिकेच्या शाळेसमोर सांडपाणी वाहिनी तुंबली आहे. त्यामुळे मैलामिश्रित पाणी रस्त्यावर पसरून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ही सांडपाणी वाहिनी दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
या परिसरात मागील दोन दिवसांपासून सांडपाणी वाहिनी तुंबली आहे. त्यामुळे मैलामिश्रित पाणी रस्त्यावर आले आहे. हे सांडपाणी मोरेवस्ती मुख्य रस्ता तसेच अंगणवाडी सोसायटी परिसरात पसरले आहे. हे मैलामिश्रित पाणी रस्ते आणि सोसायटीमध्ये पसरल्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कळवून सुद्धा दखल घेतली गेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.