Kolhapur News: देवराईत मुक्त अभ्यासिका सुरू; राधानगरी बायोडायव्हर्सिटी ग्रुपच्या उपक्रमातून अभ्यासाची संधी
esakal October 18, 2025 03:45 AM

कोल्हापूर: नैसर्गिकदृष्ट्या संपन्न, जैवविविधता, सांस्कृतिक-पारंपरिक वारसा जपणाऱ्या देवराईमध्ये अभ्यास करण्याची सुविधा आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे. निसर्गसंवर्धनात कार्यरत असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील बायोडायव्हर्सिटी ग्रुपने देवराईत मुक्त अभ्यासिका साकारण्याचं नवं पाऊल उचलले आहे. फराळे गावातून उपक्रमाची सुरुवात होणार आहे.

मांजरखिंड ते काळम्मावाडी धरणाच्या गेटपर्यंतच्या परिसर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने आठ शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते एकवटले आणि त्यातून बायोडायव्हर्सिटी ग्रुपची सुरुवात झाली. पाच वर्षांपासून ते प्लास्टिकमुक्तीसाठी कार्यरत आहेत.

निसर्गाला आरक्षण द्या, नाहीतर मरणाला तयार व्हा...

त्यांच्या कामाचा मोठा परिणाम झाला आहे. या ग्रुपने आता देवराईमध्ये मुक्त अभ्यासिका सुरू करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात फराळे गावातील श्री डोंगराई (अंबाबाई) देवीच्या देवराईपासून केली जाणार आहे.

या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हस्ताक्षर सुधारणा मोहीम, इंग्रजी व्याकरण कार्यशाळा राबविली जाणार आहे. तिथल्या झाडांची माहिती विद्यार्थी, पर्यटकांना देण्यासाठी झाडांना क्यूआर कोड लावले जाणार आहेत. फुलपाखरू उद्यान केले जाईल. फॉरेस्ट बाथची संकल्पना राबविण्याचे नियोजन या ग्रुपने केले आहे. त्याने देवराईंचे अस्तित्व टिकविण्यासह विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पाठबळ मिळणार आहे.

Kolhapur Gokul News: गाई-म्हशी घेऊन दूध संस्थाचालक गोकुळ कार्यालयावर धडकले | Sakal News

मुक्त अभ्यासिकेची म्हणून गरज

सध्या बहुतांश घरांमध्ये अभ्यासाची जागाच गायब झाली आहे. त्यामुळे शहरात खासगी अभ्यासिकांची संख्या वाढत आहे. ती स्थिती आणखी काही वर्षांनी ग्रामीण भागात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ते लक्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात अभ्यासाची संधी मिळावी यासाठी मुक्त अभ्यासिकेची गरज आहे. त्यादृष्टीने बायोडायव्हर्सिटी ग्रुपने या मुक्त अभ्यासिकेचा उपक्रम हाती घेतला आहे. देवराईमध्ये प्राणवायू उपलब्धतेचे प्रमाण अधिक आणि शांतता असते. अशा वातावरणात अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने होतो.

आपल्यापरीने द्या मदतीचा हात

आमच्या या उपक्रमाला नागरिकांचे पाठबळ लागणार आहे. सुस्थितीतील जुन्या खुर्च्या, कपाट, टेबल, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागणारी पुस्तके आदी साहित्याच्या स्वरूपात नागरिकांना मदत करता येईल. काही सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करता येईल, असे आवाहन बायोडायव्हर्सिटी ग्रुपचे संस्थापक नंदकिशोर सूर्यवंशी यांनी केले.

देवराईंचे अस्तित्व टिकविण्यासह विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने आम्ही देवराईत मुक्त अभ्यासिका सुरू करण्याचे ठरविले आहे. फराळेतील देवराईतून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर या उपक्रमाचा प्रारंभ करण्याचे नियोजन आहे. राधानगरी तालुक्यात तीस देवराई असून, त्याठिकाणीही अभ्यासिका सुरू करण्याचा मानस आहे.

- प्रा. आर. के. पाटील, सदस्य, बायोडायव्हर्सिटी ग्रुप

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.