Banana Farming : ऊसाऐवजी केळीची शेती करून २७ लाखांचे उत्पन्न;अरणवाडीच्या केळीचा परदेशी प्रवास
esakal October 18, 2025 03:45 AM

किल्लेधारूर, ता. १६: धारूर तालुक्यातील अरणवाडी येथील प्रगतशील शेतकरी दादासाहेब फुटाणे यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करून केळी पिकातून तब्बल १५० टन उत्पादन घेतले असून, त्यातून त्यांना २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

हा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, आधुनिक शेती आणि योग्य बाजारपेठेच्या जोरावर ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखवणारा आहे.धारूर तालुक्यातील अरणवाडी परिसरात पाणी मुबलक असल्याने तो परिसर सधन मानला जातो.

Chh. SambhajiNagar: बारा उड्डाणपूल आणि दोन भुयारी मार्ग! संभाजीनगरच्या रस्त्यांवर वाहतुकीचा नवा चेहरा

याआधी या भागातील शेतकरी उसाला प्राधान्य देत होते, मात्र दादासाहेब फुटाणे यांनी प्रयोगशीलतेचा ध्यास घेऊन ऊस पिकाला फाटा देत केळी लागवडीकडे वळले आहे. यामुळे लाखोंच्या उत्पन्नाच्या शक्यता उघडल्या आहेत.

Anandwadi Protest : रस्त्यासाठी गावकऱ्यांचे अकरा तास जलसमाधी आंदोलन; प्रशासनाची मोठी धावपळ

दादासाहेब फुटाणे यांनी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या चार एकर शेतीत जळगाव येथील पाटील बायोटेक (जी-९) कंपनीची केळीची ५,५०० रोपे प्रति रोप १८ रुपये या दराने लागवड केली. पीक तयार होईपर्यंत मजुरी, खत, औषधे व देखभाल यासाठी अंदाजे पाच लाख रुपये खर्च आला.

निर्यातीतून मिळाला भरघोस फायदा:

केळी तयार झाल्यानंतर, टेंभुर्णी येथील व्यापारी अभिजित बंदे यांनी थेट अरणवाडी येथूनच केळी खरेदी करून ती इराक आणि इराण या देशांमध्ये निर्यात केली. निर्यातीत केळीला प्रतिकिलो १७ ते २३ रुपये असा दर मिळाला. चार एकरांतून एकूण सुमारे १५० टन केळी उत्पादन झाले, जे दादासाहेब यांना २७ लाख रुपयांचे उत्पन्न देणारे ठरले.

शास्त्रीय पद्धती आणि योग्य नियोजन:

शेतीत मेहनत, शास्त्रीय पद्धतीचा वापर आणि योग्य बाजारपेठेची निवड केल्यास मोठे उत्पन्न मिळू शकते, याचा हा ठोस अनुभव आहे. अरणवाडी परिसरातील तरुण शेतकऱ्यांसाठी दादासाहेब फुटाणे यांची ही यशोगाथा आदर्श आहे. त्यांनी आधुनिक शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.

पारंपरिक शेतीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करावा. तालुक्यातील अनेक शेतकरी आता आधुनिक शेती करून मोठे उत्पन्न मिळवत आहेत. याबाबत आमचे देखील मार्गदर्शन कायमस्वरुपी सुरु आहे.

- जनार्धन भगत, तालुका कृषी अधिकारी

अरणवाडी व घागरवाडा या दोन्ही तलावांच्या खाली आमचे गाव असल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. त्यादृष्टीने यावर्षी चार एकर शेतीवर ५,५०० झाडे लावली होती. योग्य नियोजनामुळे मोठे उत्पादन मिळाले आणि केळी परदेशात गेली.

- दादासाहेब फुटाणे, केळी उत्पादक शेतकरी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.