BDCC Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीसाठी सहकार क्षेत्र ढवळले; जोल्ले-जारकीहोळी, कत्ती-सवदी पॅनेलकडून जोरदार प्रयत्न, 'रिसॉर्टचे राजकारण' सुरू
esakal October 18, 2025 06:45 PM

बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (बीडीसीसी) बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीला (Belgaum BDCC Bank Election 2025) केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. रविवारी (ता. १९) बँकेची निवडणूक होणार आहे.

एकूण १६ संचालक जागांपैकी नऊ जण बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे उर्वरित सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी जोल्ले-जारकीहोळी आणि कत्ती-सवदी पॅनेलकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आपल्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी या दोन्ही गटांने शड्डू ठोकला आहे.

विरोधकांच्या हाती बँकेची सत्ता जाऊ नये, यादृष्टीने जारकीहोळी बंधूंनी संबंधित क्षेत्रातील जिंकण्याची क्षमता अधिक असणाऱ्या उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आतापासून प्रयत्न सुरू केले आहेत. एखाद्या वेळेस बँकेची सत्ता जारकीहोळी बंधूंच्या हाती गेल्यास सहजासहजी त्यांना सत्तेतून बाहेर काढणे कष्टप्रद असल्याचे जाणून कत्ती आणि सवदी जंगजंग पछाडत आहेत. जिल्ह्यातील विविध मठाधीश, स्वामी, नेते, उद्योजक आणि संबंधिताद्वारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कणेरी मठाचे स्वामी वादाच्या भोवऱ्यात! काडसिद्धेश्वर स्वामींना 'या' जिल्ह्यात दोन महिने प्रवेशबंदी, असं कोणतं धार्मिक भावना भडकविणारं वक्तव्य केलं?

बँकेच्या नऊ जागा बिनविरोध झाल्याने आपल्या पॅनेलचा विजय झाल्याचे जारकीहोळी-जोल्ले गटाने सांगितले असले, तरी कत्ती-सवदी गटाने मतदानाचा हक्क असणाऱ्या पीकेपीएस सदस्यांवर स्वामी, उद्योजक, मठाधीशांद्वारे प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, तर पुढील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील लिंगायत मतदारांची मोट बांधण्याचे काम जारकीहोळी-जोल्ले गट करीत आहेत. १३ पैकी सातहून अधिक लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये कोणताही उमेदवार विरोधी गटात जाऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

रिसॉर्टचे राजकारण?

बँकेच्या निवडणुकीमध्ये ‘रिसॉर्टचे राजकारण’ सुरू झाले असून, मतदारांना आपल्या मालकीच्या साखर कारखान्यासह विविध मोठ्या हॉटेलमध्ये ठेवून त्यांची बडदास्त ठेवण्यात येत आहे. काहींना महाराष्ट्र तथा गोवा राज्यात पाठविण्यात आले आहे. ‘अर्थपूर्ण’ व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.