तळेगाव स्टेशन, ता.१९ : घरे, इमारती, दुकाने आदींवर चढलेला विद्युत रोषणाईचा साज, रांगोळीने सजलेली अंगणे एका कोपऱ्यात मातीच्या किल्ले आणि खरेदीसाठी ग्राहकांनी गजबजलेल्या बाजरपेठांमुळे तळेगाव दाभाडेसह मावळातील घरोघरी दिवाळीतील चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
अश्विन पौर्णिमेपासून एकीकडे विविध मंदिरांत सुरू झालेल्या काकडा आरत्यांच्या सुरांनी रंग भरला आहे. तर दुसरीकडे भाद्रपदी बैलपोळ्यानंतर कपड्यांची दुकाने, मिठाई भांडार, विद्युत रोषणाईची दुकाने झगमगून निघालेली दिसत आहेत. विविध रंग, रचनांचे आकर्षक आकाश कंदील, पणत्या, कृत्रिम फुलांच्या माळा अन् तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. किराणा माल आणि सुकामेव्याचे भाव यंदा काहीसे स्थिर असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी तेजी जाणवते आहे. बहुतांश जणांचा तयार फराळ खरेदीकडे वाढता कल लक्षात घेता तयार फराळाच्या विविध पदार्थांच्या दरांसह समाजमाध्यमांवर जाहिरातींद्वारे विक्रीसाठी क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. रेडिमेड कपड्यांच्या दुकानांसमोरील पुतळ्यांवर नवनवीन, रंगीबेरंगी आणि फॅशनेबल कपड्यांचा साज चढलेला दिसत आहे. बच्चेमंडळी आणि तरुणाई साहजिकच कपडे खरेदीसाठी पालकांकडे अट्टहास धरताना नजरेस पडते आहे. चाकण रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे आवार आणि मारुती मंदिर चौकालगत तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर फटाक्यांची दुकाने थाटली आहेत.
मारुती मंदिर चौक, स्टेशन रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वराळे रस्त्यावर तसेच चाकण रस्त्यावर देखील ठिकठिकाणी छोटे, मोठे स्टॉल लागले आहेत. दिवाळीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, पणत्या, रांगोळी, केरसुणी विक्रीसाठी हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. खरेदीसाठी पुढील दोन दिवसांत तळेगावातील बाजारपेठांत दिवाळीचा उत्साह आणखी फुलणार आहे.
कर्नाटकातील केरसुणी
यंदा लांबलेल्या जोरदार पावसामुळे उघडीप न मिळाल्याने शिंदाडाच्या झाडाची पाने वाळवून, झोडून कच्चा माल तयार करता न आल्याने लक्ष्मीपूजनाला मान असलेली केरसुणी थेट कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातून आयात करावी लागली. यंदा आकारानुसार ४० ते ७० रुपये प्रतिनग भाव आहे. त्यातही लोक आणखी कमी भावाची अपेक्षा ठेवतात. एक हजार केरसुण्या विक्रीसाठी आणल्या असून वाहतूक खर्च वगळता किमान १० रुपये तरी नफ्याची अपेक्षा आहे.
- शोभा जाधव, पारंपरिक केरसुणी विक्रेत्या, तळेगाव दाभाडे