गोमंतक शैलीतील स्थापत्याविष्कार
esakal October 20, 2025 12:45 AM
ओंकार वर्तले ovartale@gmail.com

गोव्यातील बहुतेक साऱ्या मंदिरांना एक प्रकारचा थाट आहे आणि त्यातही एक प्रकारचा साज आहे . या साऱ्यांच्या मागे एक इतिहासाची झालरदेखील चिकटलेली आपल्याला दिसते. इतकी छान आणि सुंदर मंदिरे या गोव्याच्या ‘सुशेगात’ वातावरणात उभी आहेत. गरज आहे ती फक्त पावले वळवायची.

गोवा आणि मंदिरे हे समीकरण अनेकांना बुचकळ्यात टाकणारे वाटेल. गोव्यात जाऊन मंदिरे पाहायची ही संकल्पनाच अनेकांच्या पचणी पडणार नाही; पण हे मात्र तितकेच खरे आहे की मंदिरे केवळ पाहण्यासाठीसुद्धा गोव्याची सहल काढायला हरकत नाही. गोव्यात फिरताना पर्यटकांना महालक्ष्मीची अनेक मंदिरे दिसतात. त्यातली बांदिवडे गावचे अप्रतिम ‘महालक्ष्मी मंदिर’. हे मंदिर आपल्याला एक सुंदर अनुभव पाठीशी देते. गोव्यातील इतर मंदिरासारखीच या मंदिराची वास्तु भव्य आणि सुरेख आहे. मंदिरावर आता नवीन वास्तु-स्थापत्याच्या खुणा जरी दिसत असल्या तरी मंदिराचे वेगळेपण आणि देखणेपण हे आपल्याला प्रत्येक कोपऱ्यात दिसते. शांत आणि रम्य असे सुंदर मंदिर आहे.

सुंदर नक्षीकाम असलेले फाटक पर्यटकांचे मंदिरात स्वागत करते. मंदिराच्या दोन्ही बाजूंनी आत प्रवेश करता येतो. पिवळ्या, पांढऱ्या आणि लाल रंगांची रंगसफेदी इतकी सुरेख केली आहे की निसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर आणखीनच उठून दिसते. हे मंदिर अशा रंगांत आणि तेही अगदी कलात्मक पद्धतीने रंगावणाऱ्या कलाकारांना दाद द्यायलच हवी. मंदिराच्या समोरच जुना दगडातला दीपस्तंभ ठेवलेला दिसतो. हा एवढाच दीपस्तंभ आपल्याला जुन्या काळाची आठवण करून देतो. तसेच याच्या विरुद्ध बाजूला नवीन दीपस्तंभसुद्धा उभारलेला आहे. दोन्ही वेगवेगळ्या काळातील असे स्तंभ पाहायला मिळतात. मंदिराच्या भोवती चहूबाजूला चांगली फरसबंदी केलेली दिसते. मंदिराला भव्य सभामंडप असून तो प्रशस्त आणि गोलाकार खांबांवर उभा आहे. संपूर्ण मंदिराला उतरत्या आणि लाल रंगातल्या कौलसदृश छत उभारले आहे. तसेच मंदिराचा कळस हा काहीसा पॅगोडा शैलीतला वाटतो.

मंदिराच्या बाजूला नारळी-पोफळीच्या बागेत हरवलेला सुंदर असा छोटा तलावही पाहायला मिळतो. हे पाहून झाले की मग याच गावात असलेल्या दुसऱ्या मंदिराकडे वळायचे. गोव्यातील अनेक देवता दुसऱ्या गावाहून नवीन ठिकाणी वस्तीला आल्या. म्हणजेच त्यांचे मूळ ठिकाणाहून स्थलांतर झाले. याला कारण पोर्तुगीजांचे अत्याचार. त्या मानाने श्री नागेशी म्हणजेच श्री शंकराचे हे स्थान स्वयंभू असल्याचे मंदिर अभ्यासक मानतात. बांदिवडेचे श्री नागेशी मंदिर हे गोव्यातील इतर मंदिरांप्रमाणेच भव्य आणि दिव्य आहेच; पण या मंदिराला काहीशी निसर्गाची आणि इतिहासाची झालर चिकटलेली दिसून येते.

मुख्य मंदिर यामध्ये सभामंडप, गाभारा तसेच या मुख्य मंदिराशेजारीच उंच आणि भव्य अशी दीपमाळ आणि याच्या शेजारीच व्यवस्थापक समितीची कार्यालय आणि इमारत आणि या साऱ्यांच्या समोर एक सुंदर आखीव आणि रेखीव तळे हे दृश्य अलगदपणे डोळ्यात उतरते. हे तळे मात्र आहे देखणे. कारण या सुंदर तळ्याला नारळी- पोफळीच्या- सुपारीच्या झाडांचे कोंदण लाभले आहे. त्यामुळे या तळ्याकाठी बसून मंदिर पाहणे हा आणखीनच सुंदर अनुभव. या तलावात साफसफाई करताना आणि या तलावातील गाळ उपसताना एक अतिशय सुंदर मूर्ती सापडली. उमेसहित आलिंगन रूपात असलेली ही शिवमूर्ती मात्र अतिशय देखणी असून ती मंदिरात ठेवलेली आहे.

मंदिराची रचना ही सभामंडप आणि गाभारा अशी आहे. या साऱ्या इमारती नवीन जीर्णोद्धारीत आहेत. मंदिरावर उतरत्या कौलेसदृश रचना केलेली दिसते. गाभाऱ्यात स्वयंभू लिंग असून, त्यावर सुवर्णाचा मुखवटा लावलेला दिसतो. या शिवलिंगाच्या बाजूला गणपतीची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आपल्याला दिसते. इतिहासाची आणखी एक साक्ष मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला पाहायला मिळते. व्याघ्रमुखी चालुक्याचे चिन्ह या भिंतीवर कोरलेले पाहायला मिळते.

याशिवाय या मंदिरात आणखी एक ऐतिहासिक ठेवा आपल्याला सापडतो, तो म्हणजे इसवी सन १४१३मधील एक शिलालेख. हा शिलालेख म्हणजे गोव्याच्या मराठी परंपरेचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. हा शिलालेख त्या वेळी दक्षिण भारतावर सत्ता असलेल्या विजयनगरच्या संगम देवराय (पहिला) याच्या कालखंडातला आहे. अशा या मंदिरभेटीत आपले तास- दोन तास कसे जातात, हे कळतदेखील नाही. इतिहासाच्या संदर्भामुळे गोव्यातील इतर मंदिरांपेक्षा हे अधिक भाग्यवान ठरते, ते यामुळेच.

बदामी चालुक्य, गोवा कदंब, विजयनगर साम्राज्यांच्या इतिहासाबरोबर हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचे नातू शाहू छत्रपती यांचाही नागेशाच्या मंदिराशी संबंध आला होता. याविषयीचे अनेक संदर्भ पुस्तकात वाचायला मिळतात. या मंदिराच्या खर्चाची सोय पेशव्यांच्या काळात होत, असे सांगितले जाते. एकंदरीतच अनेक सत्तांच्या काळात या मंदिराचे महत्त्व अधोरेखित होते.

संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही या मंदिराच्या आवारात आला तर या मंदिराचा परिसर तुम्हाला मोहवून टाकल्याशिवाय राहणार नाही. हे पाहून आपण गोमंतक भूमीतले पाषाणपुष्प असलेल्या तांबडी सुरला मंदिराकडे निघायचे. साऱ्या मंदिरातही सगळ्यात देखण्या आणि वास्तु-स्थापत्यात सजलेल्या मंदिराचा मान मिळवला आहे तो याच तांबडी सुरला महादेव मंदिराने. मंदिर अभ्यासकांच्या मते हे मंदिर गोव्यामधील सर्वात प्राचीन आहे.

पणजीवरून पहिल्यांदा फोंडा गाठायचा आणि मग तेथून तांबडी सुरला गाठायचे. गोव्याच्या राजधानीपासून हे अंतर साधारण ८० किमी आहे. अनमोड घाटाच्या पायथ्याशी हे ठिकाण आहे. मुख्य रस्त्यापासून जसे आपण मंदिराच्या दिशेने वळतो तिथपासून ते अगदी मंदिर येईपर्यंत जो काही रस्ता तुम्हाला लागतो त्याला मात्र तोड नाही.

शांत वातावरणात, पर्वतराजीनच्या कुशीत उभारलेले आणि दाट झाडीत हे मंदिर यादव-कदंब शैलीतील गोव्यातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. पावसाळ्याच्या दिवसात आलो की या भागात एक सुरला धबधबा फार प्रसिद्ध आहे. आजूबाजूला चांगली फुलवलेली हिरवळ व बाग, मंदिराला घातलेले कुंपण आणि या सर्वात मधोमध अगदी डौलाने असलेले ही पाषाणातले पुष्प... आपण काही क्षण स्तंभितच होतो.

दगडात बांधलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराला गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि मुखमंडप अशी रचना आहे. सभामंडप हा एकूण १६ खांबांनी तोललेला दिसतो. या सभामंडपात येण्यासाठी आपल्याला पूर्व, दक्षिण, उत्तर अक्षय तीनही बाजूंनी प्रवेश करता येतो. मध्यभागी गोल रंगशिळा असून सध्या त्यावर नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. या सभामंडपात उभे राहून छताकडे पाहिले की एक कलाकारांच्या कलाकुसरेचा उत्कृष्ट नमुना दगडी झुंबराच्या रूपाने पाहायला मिळतो. एखाद्याला कागदावरही काढायला जमणार नाही, अशी कला त्या कलाकारांनी दगडात घडवलेली दिसते. कमळाचे उमललेले फूलच एकाच दगडातून कोरून काढलेले आहे. सभामंडपात तीन बाजूंना बसण्यासाठी कक्षासने केलेली आहेत.

Premium|Takali Dhokeshwar caves: सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं टाकळी ढोकेश्वर लेणं; प्राचीन वारशातलं अध्यात्मिक सौंदर्य

मंदिर नागर शैलीतले आहे याचा ढळढळीत पुरावा आपल्याला मंदिराच्या शिखरावर दिसतो. शिखराच्या पश्चिम दिशेला शिव आणि पार्वती ही शिल्प दिसते. नृत्य करणारा शिव ही कदंब शैलीची ओळख. याशिवाय शिखरावर आणखीही शिल्पे दिसतात. ती म्हणजे उत्तर दिशेला गणपतीसह गजलक्ष्मी, दक्षिण दिशेला भरव आणि ब्रह्मा तर पूर्वे दिशेला लक्ष्मी-नारायण ही शिल्पे आपल्याला मोहित करतात. मंदिराची बाहेरील बाजू जरी कलाविरहित असली तरीही मात्र दगडांच्या भिंतीची रचना ही घडी केलेल्या दगडांची आहे, त्यामुळे मंदिराला फेरी मारताना आपल्याला एका वेगळ्या रचना पाहिल्याचे समाधान वाटते. बाहेरील बाजूस म्हणजे गर्भगृह सोडून उतरत्या छपराची रचना पाहायला मिळते. ही शैली खास कर्नाटक भागात पाहायला मिळते.

मंदिर सुरुवातीला पाहताना काहीसे बसके वाटते, कारण संभामंडपाची उंची ही काहीशी कमी वाटते; पण बहुधा ती उतरत्या छपराच्या रचनेमुळे असावी. गोव्यावर अनेक परकीय सत्तांनी राज्य केले, त्यातही पोर्तुगीज ही सर्वाधिक काळ सत्तेत होते. त्यांनी तर अनेक हिंदू देवस्थानची नासधूस केली. अनेक मंदिरे नष्ट केली. त्यांचे अस्तित्वच नाहीसे केले; पण आपले नशीब थोर हे मंदिर पोर्तुगीजांच्या तावडीतून वाचले. या मंदिराशिवाय गोव्याचे पर्यटन अपुरेच.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.