कळंबोलीत जुन्या पाइपलाइनच्या बदलाला मंजुरी
पनवेल, ता. १९ (बातमीदार) ः कळंबोली गावातील सिडकोच्या काळातील ३० ते ३५ वर्षे जुनी व जीर्ण झालेली पाण्याची पाइपलाइन अखेर बदलण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेकडून नवीन पाइपलाइन टाकण्याचे आश्वासन देण्यात आले असून, लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. माजी नगरसेवक विजय खानावकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. कळंबोली गावातील सेक्टर १, १ ई, २ ई आणि ३ या भागांमध्ये सिडकोच्या काळात टाकण्यात आलेली पाइपलाइन कालांतराने पूर्णपणे जीर्ण झाली आहे. या पाइपलाइनमधून वारंवार गळती होत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता, तसेच नागरिकांना योग्य दाबाने पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. रस्त्यावर पाणी साचून वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्रास होण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. अखेर माजी नगरसेवक विजय खानावकर यांनी पालिकेकडे सातत्याने मागणी लावून धरल्यामुळे, संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जुनी पाइपलाइन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या मते, नवीन पाइपलाइन बसवल्यानंतर केवळ पाणीपुरवठ्याचा दाब सुधारेल असे नाही, तर पाण्याचा अपव्यय थांबून स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा सातत्याने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या कामाची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.