Nashik Crime : ५० लाखांची लाच मागितली! नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधीक्षकाला सीबीआय कडून अटक, तात्काळ निलंबित
esakal October 20, 2025 05:45 AM

नाशिक: उद्योजकाकडून ५० लाखांची लाच मागत २२ लाखांत तडजोड करून पाच लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या बँक खाते व मालमत्तेची चौकशी सुरू आहे.

जिल्ह्यातील उद्योजकाकडून ‘जीएसटी’मधे अनियमितता केल्याच्या आधारे ५० लाखांची मागणी सेंट्रल जीएसटी अधीक्षक हरिप्रकाश शर्मा यांनी केली होती. तडजोडीअंती २२ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यापैकी पाच लाख रुपये रोख उद्योजकाकडून घेताना पुणे येथील सीबीआय पथकाने शर्मा यास अटक करीत गुन्हा दाखल केला होता.

पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर विशेष न्यायालयाने युक्तिवाद ऐकून शर्माची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, शर्मासोबत आलेल्या तीन निरीक्षकांची चौकशी प्रलंबित आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालय, वस्तू सेवाकर तथा उत्पादन शुल्क, सीजीएसटी विभागाचे आयुक्त प्रदीप गुरुमूर्ती (नाशिक) यांनी या घटनेची गंभीर दखल घेत हरिप्रकाश शर्मा याच्या निलंबनाचे आदेश काढले.

Beed News : छातीत लागली गोळी, रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; बीडमध्ये खळबळ

दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर निलंबित करीत त्याला येथील मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय नाशिक सोडू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शर्मा याच्याबरोबर आलेले अखिलेश, विशाल व अर्पित या तिन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.