विधवेशी इन्स्टावर ओळख, लग्नानंतर चारित्र्यावर संशय; पतीने हत्येनंतर हिटरचा शॉक बसल्याचा बनाव रचला
esakal October 20, 2025 05:45 AM

बंगळुरूत एका ३२ वर्षीय महिलेची तिच्या २५ वर्षीय पतीने गळा दाबून हत्या केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केलीय. हत्या केल्यानंतर पतीने हिटरचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं सत्य सांगितलं. प्रशांत कम्मार असं २५ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तर रेश्मा असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी इलेक्ट्रिशियन असून तो बेल्लारी जिल्ह्यातल्या हुविना हडगली इथं राहतो. रेश्माच्या बहिणीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,रेश्माचं पहिलं लग्न सुरेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. मात्र लग्नाच्या वर्षभरातच आजारपणामुळे पतीचं निधन झालं. पहिल्या पतीपासून झालेली रेश्माची मुलगी आता १५ वर्षांची आहे. वर्षभरापूर्वी रेश्माची प्रशांतसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर प्रशांत रेश्माच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. इतरांसोबत तुझे संबंध आहेत असा आरोप करून तो वादही घालायचा. १५ ऑक्टोबरला दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणावेळी प्रशांतने रेश्मावर हल्ला करत तिची गळा दाबून हत्या केली.

Beed News : छातीत लागली गोळी, रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; बीडमध्ये खळबळ

रेश्माच्या हत्येनंतर प्रशांतने तिचा मृतदेह बाथरूममध्ये ओढत नेला. पाण्याची बादली भरून हिटर चालू केला. जेव्हा सायंकाळी रेश्माची मुलगी शाळेतून परतली तेव्हा तिने बाथरूमचा दरवाजा बंद असल्याचं पाहिलं. तर आई बेशुद्धावस्थेत पडल्याचं दिसलं. स्थानिकांनी रेश्माला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र तिथं तिला मृत घोषित कऱण्यात आलं.

पोलिसांनी सुरुवातीला चौकशी केली तेव्हा प्रशांतने रेश्माचा मृत्यू वीजेचा शॉक बसून झाल्याचं सांगितलं. पण त्याच्या वागण्यावरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी करताच सत्य समोर आलं. त्याने गुन्हा मान्य केला असून हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.