IMD Weather Update : महाराष्ट्रावर आता पुन्हा एकदा मोठं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट, धोका वाढला
Tv9 Marathi October 20, 2025 05:45 AM

महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला होता, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकासन झालं. अतिमुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला, नद्यांचं पाणी लोकांच्या घरात घुसल्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला. पावसामुळे महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झालं. दरम्यान पावसाचं संकट आता टळलं आहे, असं वाटत असतानाच पुन्हा एकदा (IMD) भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे, ऐन दिवाळीच्या काळात मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मुंबईसह आसपासच्या परिसरात ऑक्टोबर हीटचा चांगलाच तडाखा बसत आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत, मात्र अशाच आता पुन्हा एकदा राज्यामध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रविवारपासूनच तापमानात घट होण्यास सुरुवात होईल, त्यानंतर सोमवारपासूनत ते बुधवारपर्यंत मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे, यासोबतच दक्षिण अंदमानच्या समुद्रात देखील कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, तर येत्या 48 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात देखील आणखी एक नवं कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे.

याचा परिणाम म्हणून केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, आणि पुडुचेरीच्या विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, तर महाराष्ट्राच्या देखील अनेक भागांमध्ये या काळात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्यामुळे याचा फटका हा कापसासारख्या पिकांना बसू शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.