भारतीय क्रिकेटमध्ये गिल पर्व सुरु झालं आहे. कसोटीनंतर आता वनडे संघाची धुरा त्याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शुबमन गिलने चांगलं नेतृत्व सिद्ध केलं. आता वनडे क्रिकेटमध्येही त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आणि पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 7 गडी राखून पराभूत केलं आहे. या सामन्यात टीम इंडिया सर्वच पातळीवर ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमकुवत दिसली. कोणतीच बाजू भक्कमपणे दिसून आली नाही. त्यामुळे या वनडे मालिकेत पुढे काय होणार? याचा अंदाज क्रीडाप्रेमी बांधत आहेत. पण या पराभवानंतरही शुबमन गिलला काही एक फरक पडलेला दिसत नाही. कारण या सामन्यानंतर त्याने या पराभवाचं विश्लेषणच तसं केलं.
शुबमन गिलला टीम इंडियाच्या खराब फलंदाजी आणि गोलंदाजीबाबत विचारलं गेलं तेव्हा त्याने सांगितलं की, ‘जेव्हा तुम्ही पॉवरप्लेमध्ये तीन विकेट गमावता तेव्हा सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करता. आम्हाला या सामन्यातून खूप काही शिकता आलं आणि काही गोष्टी सकारात्मक घडल्या. आम्ही फक्त 130 धावा डिफेंड करत होतो. तरीही आम्ही हा सामना खूप खोलवर घेऊन गेलो. यामुळे मी समाधानी आहे.’ यावेळी शुबमन गिलने भारतीय चाहत्यांचे आभार मानले. ‘आम्ही खूप भाग्यवान आहोत की चाहते मोठ्या संख्येने आले होते आणि आशा आहे की ते अॅडलेडमध्ये देखील आम्हाला प्रोत्साहन देतील.’
पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे हा सामना 26 षटकांचा खेळला गेला. या सामन्यात भारताने 26 षटकात 9 गडी गमवून 136 धावा केल्या. पण डकवर्थ लुईस नियमानुसार सुधारित टार्गेट सेट केलं गेलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 26 षटकात 131 धावांचं आव्हान मिळालं. भारताच्या 5 धावा या नियमामुळे कमी झाल्या. पण ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 21.1 षटकात फक्त 3 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. तर फलंदाजीत केएल राहुलने सर्वाधिक 38 आणि अक्षर पटेलने 31 धावा केल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यावर मालिकेचा निर्णय अवलंबून असेल. भारताने हा सामना गमावला तर मालिका हातून जाईल.