Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर ही शस्त्रसंधी झाली आहे. दरम्यान, आता एकीकडे हे युद्ध थांबले असल्याचे म्हटले जात असले तरी दुसरीकडे मात्र इस्रायलकडून गाझा पट्टीत हल्ले सुरच आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायली लष्कराने नुकतेच गाझावर हल्ले केले आहेत. या रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एकीकडे हमास गाझा पट्टीतील प्रॅलेस्टिनी नागरिकांवर हल्ला करत आहे, असा दावा अमेरिकेकडून केला जात आहे. तर असा आरोप म्हणजे हे इस्रायलचे कारस्थान आहे, असा प्रतिवाद हमासकडून केला जातोय. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या काळात इस्रायलने गाझा पट्टीत हवाई हल्ले केले आहेत. रविवारी सकाळी दक्षिणी गाझामधील राफा येथे इस्रायली सैन्यावर हल्ले झाले. त्यानंतर इस्रायली सैन्याने प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीत हल्ले केल्याचे बोलले जात आहे.
इस्रायल आणि हमास एकमेकांवर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी अगोदर राफा येथे इस्रायली सैन्यावर गोळीबार केला. याच दिवशी खान युनिस या भागात इस्रायली सैनिकांच्या दिशेने काही दहशतवादी येत होते. या दहशतवादी समूहाने इस्रायली सैन्यावर हल्ला केला. त्यामुळेच समोर उभ्या राहिलेल्या संकटाला दूर सारण्यासाठी इस्रायली सैनिकांनी हल्ले केले, असे इस्रायलने सांगितले आहे. भविष्यातही आमच्यापुढचे धोके संपवण्यासाठी आमची अशी कारवाई चालूच राहील, असे इस्रायलने सांगितले आहे.
दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात नुकतेच ओलीस ठेवण्यात आलेल्या लोकांची देवाणघेवाण झाली. हमासने ओलीस ठेवलेल्या 20 जिंवत इस्रायली नागरिकांची सुटका केली आहे. सोबतच ओलीस ठेवलेल्या 12 लोकांचे मृतदेहही हमासने परत केले आहे. दरम्यान आता इस्रायलने गाझा पट्टीत पुन्हा हल्ला केल्यामुळे इस्रायल-हमास यांच्यात झालेला शांतता करार आणि भविष्यातील युद्धबंदी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.